Kalyan : डॉक्टरनेच चालवलं बेकायदेशीर बालक आश्रम; महिला आणि बालविकास विभागाची कारवाई
कल्याणमध्ये एका डॉक्टरनेच बालकांचा बेकायदेशीर आश्रम चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठाणे : कल्याणमध्ये एका डॉक्टरने बेकायदेशीर बालक आश्रम सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका दांम्पत्याने त्यांच्या पोटच्या पाच दिवसाच्या बाळाला डॉक्टरलाच एक लाख रुपयात विकल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीसारख्या सुशिक्षित नगरीत घडला होता. दोन दिवसानंतर त्या आईने बाळ परत मागितले. मात्र त्या डॉक्टरने देण्यास नकार दिल्याने हा प्रकार उजेडात आला. ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाने यावर कारवाई केली असून संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टर केतन सोनी याच्यासह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासा दरम्यान हा डॉक्टर कल्याणात बेकायदेशीर बालक आश्रम चालवित असल्याचे धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या बालक आश्रमात 71 लहान मुलाना ठेवण्यात आले होते. ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाने या बालक आश्रममधून 71 बालकांची सुटका केली आहे. त्यांना शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे बालक आश्रम सुरू करून लहान मुलांना निष्काळजीपणे बेकायदेशीरपणे ठेवल्याप्रकरणी ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाने कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही मुलं त्याने कुठून व कशी आणली याचा तपास पोलीस करत आहेत. तर मुलं दत्तक देताना आणि घेताना कायदेशीर मार्गाने घ्यावेत अस आवाहन ठाणे जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने केलं आहे .
डोंबिवलीत राहणाऱ्या एका दांम्पत्याने कल्याण येथील डॉ. केतन सोनी यांना आपले 5 दिवसांचे बाळ एक लाख रूपये किंमतीला विकले. त्यांचा मोठा मुलगा आठ वर्षाचा असून तो डॉ. केतन सोनी यांच्या नंददीप संस्थेत एक वर्षापासून राहत होता. 15 नोव्हेंबर 2021 रोजी डॉक्टराने त्या दांम्पत्याकडून 1 लाख रूपये देऊन बाळाचा ताबा घेतला. दोन दिवसानंतर आईने बाळ परत मागितले. मात्र डॉकटर ने बाळ देण्यास नकार दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महिला व बाल विकास बालसंरक्षण विभागाला माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या तपासा दरम्यान आणखी धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
डॉ. केतन सोनी हे कल्याणात नंदादीप बालकाश्रम चालवीत असल्याची माहिती मिळाल्यांनतर बालसंरक्षण अधिकाऱ्यांच्या टीमकडून संस्थेत पाहणी करण्यात आली. यावेळी 29 मुले हजर असल्याचे दिसून आले. संस्थेची तपासणी केल्यानंतर लहान मोठ्या मुलींचे कपडे वाळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी मुली संस्थेत राहत नाहीत असे उत्तर दिले. बालकल्याण समितीला संशय आल्याने त्यांनी या बाबत बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बाजारपेठ पोलीसांच्या पथकासह संस्थेच्या अधिकाऱ्यांनी संस्थेच्या खोल्यांची तपासणी केली. संस्थेच्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केल्यानंतर संस्थेच्या बिल्डींगपासून काही अंतररावर एका जुन्या इमारतीत मुले असल्याची कबुली देण्यात आली.
ठाणे बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केल्यानंतर 38 मुले, मुली हे वय वर्षे 2 ते 13 वयोगटातील असल्याचं दिसून आलं. त्या मुलांना ताब्यात घेऊन बाल कल्याण समिती समोर आणण्यात आले. आजूबाजूच्या ठिकाणांहून 6 मुले संस्थेत आणण्यात आले व एकूण 71 बालके ही संस्थेत एकत्रित करण्यात आली. संस्थेच्या तपासणीत उपस्थित 71 बालकांच्या कोणत्याही फाईल्स रजिस्टर बालकांशी संबधित कोणतेच कागदपत्र आढळून आलेले नाहीत या बालकांना शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे .या प्रकरणी महिला व बालविकास विभागाने कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात डॉ केतन सोनी विरोधात गुन्हा दाखल करन्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
