सिमेंट रस्त्याचे निकृष्ठ काम; अधिकाऱ्याशी मनसेने हुज्जत घालून काम थांबवलं
MNS : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे परेश चौधरी यांनीही भिवंडी - कल्याण - शीळ या रस्त्याचे निकृष्ठ काम झाल्याचा आरोप करीत अधिकाऱ्याशी हुज्जत घालत या रस्त्याचे काम बंद पडले आहे
MNS Protest : भिवंडी - कल्याण - शीळ या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा व मनमानी कारभार केला असून या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याची तक्रार मार्च 2021 मध्ये नुकताच पंचायतराज राज्यमंत्री पदाचा पदभार घेणारे खासदार कपिल पाटील यांनी केली होती. त्यापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष परेश चौधरी यांनीही याच रस्त्याचे निकृष्ठ काम झाल्याचा आरोप करीत अधिकाऱ्याशी हुज्जत घालत या रस्त्याचे काम बंद पडले आहे. यामुळे रस्त्याच्या कामाबाबत पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
भिवंडी - कल्याण - शीळ या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने या महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरु आहे. या रस्त्यावरून कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, उल्हासनगर तसेच मुरबाड येथे जाण्याकरीताचा एकमेव व महत्वाचा तसेच मुख्य रस्ता असून हजारो हलक्या व अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून होत असते . भिवंडी-कल्याण-शिळ सहापदरी सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनविण्यात येत असून लॉकडाऊनच्या काळात देखील हे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. परंतु या काळात तयार करण्यात आलेला रस्ता निकृष्ठ दर्जाचा असल्याची तक्रारी केल्या होत्या. मे,साकेत इन्फ्रा ह्या कंपनीच्या माध्यमातून हलक्या दर्जाचे सिमेंट काँक्रेट या रस्त्याच्या कामासाठी वापरले जात असून ठिकठिकाणी रस्त्याला तडे गेले असून कामही संथगतीने सुरु आहे. त्यामुळे आजही टोलनाका ते पिंपळघरपर्यत वाहतूक कोंडीची समस्या कायमच आहे.
भिवंडी बायपास येथे असलेल्या टाटा आमंत्रा या निवासी संकुलनासमोर ठेकेदाराने चक्क मातीवरच रेडी मिक्स सिमेंट टाकून रस्ता बनवला असल्याचे पुरावे देखील त्यावेळी मनसेचे चौधरी यांनी यापूर्वीही रस्ते विकास महामंडळाला सादर केले होते. तसेच स्त्याच्या निकृष्ठ कामाबाबत व ठेकेदारावर कारवाई व्हावी तसेच संबंधित कामाची आयआयटी मार्फत चौकशीची मागणी केली होती. मात्र त्यावर संबधित विभागाने काय कार्यवाही केली ? असा प्रश्न आजही कायम असल्याचे दिसून आले. तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता युसूफ मलिक यांनी सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ठ असल्याचे कबूल करीत हा रस्ता पुन्हा तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.