Mumbai Crime : कल्याण स्थानकात फिल्मी स्टाईल थरार; मोबाईल चोराचा RPF जवानांकडून पाठलाग अन्...
Mumbai Crime News : Kalyan : चोरटा चोरी करुन पळाला त्यांनी पाहिलं, अन् पाठलाग सुरु केला. त्यानंतर रंगला फिल्मी स्टाईल थरार...
![Mumbai Crime : कल्याण स्थानकात फिल्मी स्टाईल थरार; मोबाईल चोराचा RPF जवानांकडून पाठलाग अन्... Mumbai Crime News Film style thrill at Kalyan station Mobile thief chased by RPF jawans Mumbai Crime : कल्याण स्थानकात फिल्मी स्टाईल थरार; मोबाईल चोराचा RPF जवानांकडून पाठलाग अन्...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/26/eea257756a620514b01739fac2ceed65_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Crime News : धावत्या लोकल ट्रेनमधून प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळनाऱ्या चोरट्याला कल्याण आरपीएफ जवानांनी पाठलाग करुन पकडलं आहे. रामनजली करुड असं या चोरट्याचं नाव आहे. त्याच्या विरोधात बांद्रा, मुंबई सेन्ट्रलसह मुंबई उपनगरीय रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाईल हिसकाविण्याचे 15 गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास कल्याण जीआरपी करीत आहेत.
गेल्या काही दिवसापासून कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या रेल्वे स्थानकांत मोबाईल चोरी आणि मोबाईल हिसकावून पळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाच दिवसांपूर्वी एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला डोंबिवली आरपीएफ महिला जवानाने पाठलाग करुन पकडले होते. आता कल्याण रेल्वे स्थानकात अशीच घटना घडली आहे.
कुर्ला ते बदलापूर लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रमोद निशाद हा प्रवासी 23 नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास कल्याणला येत होता. कल्याण रेल्वे स्थानकांत गाडी थांबतातच गाडीतच बसलेल्या एका चोरट्यानं प्रमोद यांच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून पळ काढला. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर उभ्या असलेल्या आरपीएफ जवानांनी चोरट्याला पळत जात असताना पाहिले. त्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. चोरट्याला पकडण्यासाठी आरपीएफ जवानांनी खूप प्रयत्न केले. चोरटा वेळोवेळी हुलकावण्या देत होता. पण जवानांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर तो त्यांच्या तावडीत सापडलाच. या चोरट्याला कल्याण रेल्वे यार्डातून ताब्यात घेण्यात आलं.
चोरट्याकडून चोरलेला महागडा मोबाईल आणि इतर मौल्यवान ऐवज जप्त करण्यात आले. त्यानंतर चोरट्याला कल्याण जीआरपीच्या ताब्यात देण्यात आलं. या प्रकरणी कल्याण जीआरपीचे पोलीस निरिक्षक पंढरी कांदे यांनी रामनजली करुड हा तरुण सराईत चोरटा आहे. त्याच्या विरोधात मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात चोरी केल्याप्रकरणी पंधरा गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून अन्य चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत हेाण्याची शक्यता आहे. पुढील तपास कल्याण जीआरपीकडून सुरु आहे, अशी माहिती दिली.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या रेल्वे स्थानकांत मोबाईल चोरट्याची दहशत पसरली होती. अगदी सहज हातातील मोबाईल हिसकावून हा चोरटा पळ काढत असे. त्यामुळे नागरिक धास्तावले होते. पण सराईत चोरट्याला पकडण्यात यश आल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)