(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनाशी मुकाबला करताना होमिओपॅथी डॉक्टरांना संधी का मिळू नये? होमिओपॅथी डॉक्टरांचा सवाल
होमिओपॅथिक प्रकारातील डॉक्टरांची उपचार करण्याची पद्धत, औषधांच्या किमती या गोष्टींचा विचार करता भारतात या डॉक्टरांना कोरोना दरम्यान प्रायोगिक तत्वावरही काम करण्याची संधी मागूनही मिळू नये, ही खरंच शोकांतिक आहे, असं डॉ. पल्लवी चतुर्वेदी यांनी म्हटलं.
मुंबई : कोरोनाशी मुकाबला करण्यात सध्या जगभरातील डॉक्टरांना म्हणावं तसं यश मिळताना दिसत नाहीय. मुंबई, महाराष्ट्रासह जगभरातील डॉक्टर्स सध्या या भीषण रोगाचा नेटानं मुकाबला करत आहेत, यात शंकाच नाही. मात्र सव्वाशे कोटींची लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात कोरोना विषाणुमुळे पसरणाऱ्या कोविड-19 रोगाशी लढताना अॅलोपॅथी डॉक्टरांच्या साथीने होमिओपॅथी डॉक्टरांना संधी का देण्यात येऊ नये? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
जर्मनीत उदयास आलेल्या या होमिओपॅथिक प्रकारातील डॉक्टरांची उपचार करण्याची पद्धत, औषधांच्या किमती या गोष्टींचा विचार करता भारतात या डॉक्टरांना कोरोना दरम्यान प्रायोगिक तत्वावरही काम करण्याची संधी मागूनही मिळू नये, ही खरंच शोकांतिक आहे. गेल्या काही दिवसांत सातत्यानं केंद्र सरकारकडे होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनेकडून विनंती करण्यात आली. मात्र विनंती करुनही त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना मुंबईतील होमिओपॅथिक डॉ. पल्लवी चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोना विषाणू हा काही नव्यानं उदायाला आलेला विषाणू नाही. साल 1960 मध्येही यासंदर्भातील काही प्रकरणं समोर आली होती. मुळात विषाणू संसंर्ग हे सातत्यात येत-जात असतात. ते ज्या वेगानं वाढतात त्याच वेगान कमीही होतात. चीनमधील सध्याची स्थिती हे त्याचं उत्तर उदाहरण. त्याची नाव प्रत्येकवेळी वेगवेगळी दिली गेली आहेत. सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या या रोगानं वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागरूक केलं आहे, असं डॉ. चतुर्वेदी म्हणतात.
होमिओपॅथीत रूग्णांना हाताळण्याची स्वत:ची अशी एक पद्धत असते. एकच औषध यात सरसकट सर्वांना दिलं जात नाही. प्रत्येक रूग्णाच्या आजाराचा त्याच्या रोगप्रतिकारक क्षमतेचा अभ्यास करून त्याच्यावर विशिष्ठ उपचार केले जातात. कदाचित यामुळेच भविष्यात अॅलोपॅथीचं महत्त्व कमी होईल की काय? या भीतीने होमिओपॅथीला पुढे येऊ दिलं जात नसावं, अशी शंकाही डॉ. पल्लवी चतुर्वेदी यांनी एबीपी माझाकडे बोलताना व्यक्त केली.
संबंधित बातम्या
- निजामुद्दीनसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता 'डिजिटल प्लॅटफॉर्म', संशयित व्यक्तींचं होणार जिओ मॅपिंग
- Coronavirus | कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची खैर नाही : अजित पवार
- PM Cares Fund सुरु करुन पंतप्रधान मोदींनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही : पृथ्वीराज चव्हाण