बीएमसीचे कर्मचारी असल्याची थाप मारून ब्रिटिशकालीन वडाचं झाड कापलं, पाच जणांना अटक
महानगरपालिकेला विचारणा केल्यावर महानगरपालिकेने असा कुठलाही आदेश दिला नसल्याचा स्पष्ट केलं आणि झाड कापणारी लोकं महानगरपालिकेचे कर्मचारी नव्हते हे सुद्धा लक्षात आलं.
![बीएमसीचे कर्मचारी असल्याची थाप मारून ब्रिटिशकालीन वडाचं झाड कापलं, पाच जणांना अटक Five people were arrested for cutting down tree and lying about being a BMC employee बीएमसीचे कर्मचारी असल्याची थाप मारून ब्रिटिशकालीन वडाचं झाड कापलं, पाच जणांना अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07121623/IMG-20210206-WA0377.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : रस्त्याच्या कडेला जाहिरातीच्या बॅनरचे जास्त पैसे मिळावे म्हणून मंगळवारी रात्री काही लोकांनी गिरगाव चौपाटीजवळ असलेलं ब्रिटिशकालीन वडाच झाड कापलं. स्थानिकांनी त्यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी आपण महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचं सांगितलं आणि हे झाड कापण्यासाठी महानगर पालिकेने परवानगी दिली असल्याचीही थाप त्यांनी केली.
स्थानिकांनी या प्रकरणाचं ट्वीट उद्धव ठाकरे यांना केलं आणि याची दखल खुद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली. आदित्य ठाकरे बुधवारी दुपारी स्वतः झाड कापलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिकांनी घडलेला सर्व प्रकार आदित्य ठाकरे यांना सांगितला. त्याच्यानंतर महानगरपालिकेला विचारणा केल्यावर महानगरपालिकेने असा कुठलाही आदेश दिला नसल्याचा स्पष्ट केलं आणि झाड कापणारी लोकं महानगरपालिकेचे कर्मचारी नव्हते हे सुद्धा लक्षात आलं.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जातीने या प्रकरणात लक्ष घालत असल्यामुळे पोलिसांनी तात्काळ या संदर्भात गुन्हा नोंदवला आणि युद्धपातळीवर याचा तपास सुरू केला. एक तपास पथक बनवण्यात आलं आणि त्यांनी हे झाड कापणाऱ्यांचा शोध सुरू केला. शेवटी पोलिसांना यश आलं आणि शनिवारी पोलिसांनी 5 लोकांना माहीम परिसरातून अटक केली. हिरालाल सेवकराम दर्शन आणि मोहम्मद शफीक उर्फ अब्दुल इकबाल अशी पाच पैकीं दोन आरोपींची नावं आहेत.
बॅनर लावल्यानंतर हे झाडमध्ये मधे येत होतं. त्यामुळे पैसे कमी मिळत होते आणि म्हणून हे झाड कापल्याची माहिती या लोकांनी दिली. फक्त हेच झाड नाही तर मुंबईमध्ये अशी अनेक झाडं या लोकांकडून कापण्यात आल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मलाबार हिल परिसरामध्ये सुद्धा या लोकांनी अशाच प्रकारे झाडं कापल्याच समोर आलं असून मलबारहिल पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल आहे.
अशाप्रकारे झाड कापत असताना जर कुणी यांना याबाबत विचारलं तर हे स्वतःला महानगरपालिकेचे कर्मचारी सांगायचे. त्यामुळे पोलिसांनाही कधी यांचा संशय आला नाही. कुणाच्या सांगण्यावरून ते हे करत होते याचा तपास आता पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)