(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Atal Setu First Accident : काही दिवसांपूर्वीच लोकार्पण झालेल्या अटल सेतूवर पहिला अपघात, जिवीतहानी नाही पण वाहनाचे मोठे नुकसान
काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या अटल सेतूवर पहिला अपघात झाला. पण सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूचे (Shivdi Nhava Sheva Atal Setu) लोकार्पण करण्यात आले होते. पण रविवार 21 जानेवारी रोजी या मार्गावर पहिला अपघात घडला. रविवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. एक कार दुभाजकाला धडकल्याने हा उपघात झाला. या गाडीत एकूण पाच जण होते. पण सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. पण दुभाजकाला झालेली ही धडक इतकी गंभीर होती की, या कारचे पूर्णपणे नुकसान झाले.
दरम्यान ही कार ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आलीये. चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही गाडी दुभाजकाला जाऊन धडकली, अशी माहिती पोलिसांनी दिली. न्हावा शेवा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये सुमारे पाच जण प्रवास करत होते आणि कारमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत."
अपघात कसा घडला याचा तपास सुरु
न्हावा शेवा पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात कसा घडला याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. त्यानुसार चालकावर रॅश ड्रायव्हिंगचा देखील दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. रविवार असल्याने या मार्गावर जर वर्दळ होती. तसेच अपघात घडल्यानंतर प्रत्यक्षात काय झाले हे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. मात्र प्रवासी सुखरुप बाहेर असल्याने काही मिनिटांतच वाहतूक सुरळीत करण्यासाठी गाडी बाजूला करण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
अवघ्या काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 12 जानेवारी 2024 रोजी अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले होते. मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेला हा अटल सेतू काही दिवसांपूर्वी मुंबईकरांच्या सेवेत आला होता. पण आता या अटल सेतूवर पहिला अपघात झाल्याने चर्चांना उधाण आलंय.
असा आहे अटल सेतू
एकूण 22 किमीचा हा मार्ग असून त्यातील 16.80 किमी रस्ता समुद्रातून आहे. हा भारतातील सर्वाधिक लांबीचा समुद्री पुल असून जगात हा 12 व्या स्थानी आहे. तब्बल 18 हजार कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला हा प्रकल्प मुंबईसह, नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणार आहे. तब्बल दोन तासांचा वेळ वाचणार आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी हा पूल मैलाचा दगड असेल.