पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाने खोटा प्रचार : राष्ट्रवादी
खासदार सुप्रियाताई सुळे यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओतील सुरुवातीचा भाग एडिट करुन तो विरोधकांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले आहे : राष्ट्रवादी
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी (29 नोव्हेंबर) प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे सतीश चव्हाण हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, ट्रू कॉलरवर खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव येत असलेल्या एका मोबाईल नंबरवरुन विरोधी पक्षातील उमेदवाराचा प्रचार करत होत असल्याची बाब समोर आली आहे. यावर पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांच्या IT सेलकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाने खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
काय आहे फेसबुक पोस्ट?
खासदार सुप्रियाताई सुळे यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओतील सुरुवातीचा भाग एडिट करुन तो विरोधकांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. एक फेक मोबाईल क्रमांक सेव्ह करुन तो ट्रूकॉलवर (True caller) या App वर सुप्रिया सुळेंच्या नावाने दिसत आहे. गुंटूर येथील या मोबाईल क्रमांकावरून सुप्रिया सुळे यांचा ध्वनिमुद्रित आवाज सुपरइंपोज करून त्या पाठोपाठ एका स्थानिक त्रिस्तरीय भाजप नेत्याच्या आवाजात विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा ऑडियो मेसेज चालवला जात आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. सतीश चव्हाण यांनी प्रचारात घेतलेली आघाडी पाहून विरोधी... Posted by Nationalist Congress Party - NCP on Sunday, 29 November 2020
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर यासंबंधीचा भांडाफोड करण्यात आलेला आहे. काही जागरूक मतदारांनी त्यांना आलेल्या फोनचा स्क्रिनशॉट सोबत शेअर केला आहे. विरोधकांचे धाबे दणाणले असल्यामुळेच त्यांनी आता डर्टी ट्रीक वापरायला सुरुवात केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
"हे अतिशय नींदनीय राजकारण असून विरोधी पक्षीयांचा बॅलेट पद्धतीवर विश्वास नसल्याचे निदर्शक आहे. ही विरोधकांकडून मतदारांची दिशाभूल करण्याची अतिशय अश्लाघ्य आणि खालच्या थरावर जाऊन केलेली खेळी असून आम्ही त्याचा निषेध करतो. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. सतीश चव्हाण यांच्या प्रचारात महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विलक्षण आघाडी घेतल्यामुळे विरोधकांनी हा रडीचा डाव खेळण्याचे तंत्र अवलंबले आहे. या मोबाइल क्रमांकासंबंधी केल्या गेलेल्या तंत्रज्ञानाच्या फसव्या करामतींची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली असून निवडणूक आयोग तसेच संबंधित यंत्रणांना या करामतींच्या मागील व्यक्तींना शोधून काढून योग्य ते शासन करावे.", अशी मागणी राष्ट्रवादीने काँग्रेसने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर केली आहे.