(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Earthquake : मुंबईत भूकंप होऊ शकतो का? भूकंप झाला तर मुंबई किती सुरक्षित?
Earthquake : भूकंपाचा धोका पाहता मुंबई भूकंपाच्या दृष्टिकोनातून किती सुरक्षित आहे? यावर मुंबई आयआयटीने 2008 पासून मुंबईची भूकंपस्थिती आणि घ्यावयाची विशेष खबरदारी या संदर्भात अभ्यास केलाय.
मुंबई : तुर्की- सिरीयामध्ये भूकंपाने ( Earthquake ) हाहा:कार उडाला असून या भूकंपात हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे हा भूकंपाचा धोका पाहता मुंबई भूकंपाच्या दृष्टिकोनातून किती सुरक्षित आहे? मुंबईत भविष्यात भूकंप होण्याची शक्यता आहे का? मुंबई आणि आसपासच्या परिसरात असे कोणते भाग आहेत जिथे भूकंपाचा धोका अधिक मानला जातो? त्या दृष्टिकोनातून काय पावलं उचलली पाहिजेत. यावर मुंबई आयआयटीने 2008 पासून मुंबईची भूकंपस्थिती आणि घ्यावयाची विशेष खबरदारी या संदर्भात अभ्यास केला आहे.
तुर्की सीरियामध्ये 7.5 रिश्टरच्या जवळपास भूकंपाचे धक्के बसले आणि तेथील सर्व काही या भूकंपाच्या धक्क्याने उद्धवस्त झालं आहे. या भूकंपात हजारोंच्या संख्येने लोकांचे प्राण गेले. त्यामुळे अशा प्रकारचा भूकंप मुंबईत झाला तर दोन कोटी लोकसंख्या असलेली मुंबई किती सुरक्षित आहे? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यासाठीच मुंबई आयआयटी आणि काही तज्ज्ञांनी मुंबईच्या भूकंपा संदर्भात अभ्यास करून अहवाल तयार केला आहे.
मुंबईमध्ये इसवी सन 1600 च्या दरम्यान जवळपास तुर्की सीरिया एवढाच सात रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद आहे. त्यानंतर ही छोटे मोठे भूकंपाचे धक्के मुंबई आणि ठाण्याच्या विविध भागात जाणवले आहेत. हे धक्के चार रिश्टर स्केलपर्यंतचे होते. त्यामुळेच भूकंपाच्या दृष्टिकोनातून मुंबई आणि आसपासचा परिसर सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे, असे अभ्यासकांचे मत आहे.
मुंबईत जास्त धोका कुठे?
मुंबई हे भूकंपाच्या दृष्टीने भूकंपाच्या नकाशावर झोन 3 मध्ये येते. याचा अर्थ मध्यम-जोखीम क्षेत्र म्हणून वर्गीकृत असूनही लोकसंख्येच्या उच्च घनतेमुळे हानी आणि जीवितहानीसाठी अत्यंत संवेदनशील मानले जाते. पृथ्वीच्या कवचातून पनवेलपासून उत्तरेकडे कोपरखैरणे आणि भिवंडीमध्ये सक्रिय फॉल्ट लाइन आहेत. फॉल्ट लाइन हे असे क्षेत्र आहेत जिथे दोन टेक्टोनिक प्लेट्स एकत्र येतात आणि हालचालींना प्रवण असतात. ज्यामुळे भूकंपाची क्रिया होऊ शकते. मुंबई आणि आसपासच्या परिसरात असे एकूण 31 फॉल्ट लाइन आहेत.
मुंबई शहर हे बेटांचं शहर आहे. त्यामुळे बेटांनी मिळून हे शहर जेव्हा एकत्र झालं तेव्हा अनेक भागात भराव टाकण्यात आला आणि हेच भराव टाकलेल्या भागांना भूकंप झाल्यास धोका अधिक संभवतो. मुंबईत भविष्यात मोठा भूकंप झाल्यास मुंबईच्या पूर्व उपनगरातील शहर भूकंपासाठी विशेषतः असुरक्षित आहेत. शिवाजी नगर, गोवंडी, घाटकोपर, भांडुप, विद्याविहार आणि मुलुंड यांसारख्या काही भागात भूकंपाचा धोका अधिक जाणवू शकतो असे या अभ्यासात आढळून आले आहे. शिवाय ठाणे खाडीलगतचा भाग आणि नवी मुंबईतील काही भागाचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.
भूकंप होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे?
भूकंपाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील. मुंबईतील लोकसंख्या पाहता शिवाय गगनचुंबी इमारती पाहता या इमारती भूकंपाचा धक्का कितपत सहन करू शकतात याबाबत भूकंप तज्ज्ञांकडून या सर्व इमारतींची तपासणी करणे आवश्यक आहे. नव्या उंच इमारती बांधताना त्याचा पाया किती सुरक्षित आहे? सोबतच माती परीक्षण करून, इमारतींचं योग्य डिझाइन ठरवून भूकंपाच्या धक्क्यापासून इमारत सुरक्षित ठेवण्यासाठी तज्ज्ञांकडून वारंवार सल्ले घेणे महत्त्वाचं आहे. शिवाय मुंबईतील अशा अनेक इमारती आहेत ज्या जुन्या झालेल्या आहेत, जिथे लोकसंख्या सुद्धा जास्त आहे. अशा ठिकाणच्या भागात विशेष लक्ष देण्याची गरज असून जुन्या इमारतींचा पुनर्विकास होणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
भूकंप झाल्यास काय खबरदारी घ्यावी?
भूकंप झाल्यास घराच्या आतील दरवाजाच्या लिंटेलखाली, खोलीच्या कोपऱ्यात, टेबलखाली किंवा पलंगाखाली लपून राहा.
काच, खिडक्या, बाहेरील दरवाजे आणि भिंती (जसे की लाइटिंग फिक्स्चर किंवा फर्निचर) यासह पडू शकतील अशा कोणत्याही गोष्टीपासून दूर रहा.
भूकंप झाला तेव्हा तुम्ही तिथे असाल तर अंथरुणावर राहा. उशीने तुमचे डोके झाकून ठेवा किंवा जवळच्या सुरक्षित ठिकाणी जा.
उंच इमारतीत राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा.
दरवाजा जवळ असेल, शिवाय तुम्हाला जर भार सहन करणारा दरवाजा असेल तरच त्याचा आश्रय म्हणून वापर करा.
बाहेर पडणे सुरक्षित होईपर्यंत आणि जमिनीतील हादरे थांबेपर्यंत घरातच रहा.
संशोधनानुसार, इमारतीमधील व्यक्ती जेव्हा इमारतीच्या वेगळ्या भागात जाण्याचा प्रयत्न करतात किंवा जेव्हा ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना दुखापत होण्याची जास्त शक्यता असते.
महत्वाच्या बातम्या