एक्स्प्लोर
Advertisement
Dr. Payal Tadvi Suicide Case : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींना नायर रुग्णालयाच्या परिसरातील प्रवेश बंदी कायम
डॉ. पायल तडवीने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी असलेल्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी उर्वरीत शिक्षण पूर्ण करण्यासाठी नायर रूग्णालयात प्रवेश करु देण्याच्या मागणीची याचिका केली होती.
मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपी महिला डॉक्टरांना नायर हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश देण्यास असलेली मनाई मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी कायम ठेवली आहे. राज्य सरकार आणि पीडितेच्या कुटुंबियांप्रमाणे नायर रूग्णालय प्रशासनानंही यास आपला तीव्र विरोध स्पष्ट केला. या खटल्यातील प्रमुख साक्षीदार आणि इतर साक्षीदारांची सुरक्षा महत्त्वाची असून तिघांच्या परत येण्यानं ती धोक्यात येऊ शकते. आता कुठे त्या विभागात काम करणारे कर्मचारी घडलेल्या प्रकारातून सावरु लागलेत, मात्र या तिघींच्या परत येण्यानं परिस्थिती पुन्हा गंभीर होईल, तसेच सर्वत्र चुकीचा संदेश जाईल. डॉ. गणेश शिंदे या नायर रूग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या प्रमुखांनी शुक्रवारी हायकोर्टात उपस्थित राहून ही माहिती दिली. जी मान्य करत नायर रुग्णालयातून उर्वरित शिक्षण पूर्ण करू देण्याची आरोपींची मागणी हायकोर्टानं फेटाळून लावली. मात्र या तिन्ही आरोपींचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यासाठी दिलेल्या आपल्या पूर्वीच्या आदेशात बदल करत यासंदर्भात आयएमसीनं योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जामिनांतील पोलीस स्थानकांत हजेरी लावण्याची अटही शिथिल करत कोर्टाची पूर्व परवानगी न घेता मुंबई न सोडण्याचे निर्देश कायम ठेवत या तिघींना मायग्रेशन सर्टिफिकेट देण्यासही नकार देण्यात आला आहे.
शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी पक्षानं स्पष्ट केलंय की, यापुढे एकदिवस आड या प्रकरणाची नियमित सुनावणी घेत पुढील सहा महिन्यांत या खटल्यातील सर्व साक्षीदारांची तपासणी पूर्ण करण्यात येईल. तसेच दहा महिन्यांत हा खटला निकाली काढला जाईल. तेव्हा अंतिम निकालानंतरच या आरोपी महिला डॉक्टरांच्या पदव्युत्तर शिक्षणाबाबत निर्णय होईल. तोपर्यंत त्यांच्यासमोर आहे त्या शिक्षणावर नोकरी करून मुंबईत राहण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचंही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी स्पष्ट करत आरोपींची याचिका निकाली काढली.
डॉ. पायलला जातीवाचक टिप्पणी करून आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी आपलं उर्वरीत शिक्षण पूर्ण करण्यासाठी नायर रूग्णालयात प्रवेश करू देण्याची मागणी हायकोर्टाकडे केली होती. मात्र तिथं शिकत असलेल्या इतर साक्षीदारांचं काय? असा सवाल करत हायकोर्टानं नायर रूग्णालय प्रशासनाला यावर उपाय सुचवण्याचे निर्देश जारी केले होते. त्यावर मुंबईतील अन्य पालिका रूग्णालयातनं हे शिक्षण पूर्ण करता येईल असता अथवा दुसऱ्या राज्यातूनही शिक्षण पूर्ण करता येईल, अशी भूमिका घेत राज्य सरकारनं आरोपींच्या याचिकेस जोरदार विरोध केला होता. मात्र या तिघींना आता दुसरीकडे दाखला मिळणं कठीण झालंय अशी कबुली त्यांच्या वकिलांनी हायकोर्टात दिली.
काय आहे प्रकरण :
डॉ. पायल तडवीने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी 23 मे रोजी गुन्हा नोंदवून नायर हॉस्पिटलमधील तिच्या तीन सहकारी महिला डॉक्टरांना अटक केली आहे. यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्टरांवर रॅगिंग आणि ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement