भिवंडीत भटक्या कुत्र्यांची दहशत; एका दिवसात 15 हून अधिक नागरिकांवर हल्ला
भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने पादचारी, नागरिक आणि विशेषत: लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भिवंडी : भिवंडी शहरात (Bhiwandi) भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शहरातील दर्गा रोड परिसरात तर भटक्या कुत्र्यांनी एका दिवसात तब्बल 15 हून अधिकजणांना चावा घेऊन जखमी केले आहे. ज्यामध्ये लहान मुलांचा अधिक समावेश असून भटक्या कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेतानाची घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने पादचारी, नागरिक आणि विशेषत: लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह लहानसान रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या झुंडीवर नियंत्रण ठेवण्यात महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. शहरातील अनेक भागांतून रात्रीच्या वेळी ये-जा करणे नागरिकांना अवघड झाले आहे. मात्र भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नसताना, त्यांची नसबंदी मोहीम कोविडचे कारण सांगत बंद असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पालिकेच्या असक्षमतेमुळे नागरिकांना नाहक त्रास
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास दर्गा रोडवरील 15 हून अधिक नागरिकांना जणांना कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून त्याच्यासाठी कोणतीही व्यवस्था केली जात नाही. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरात 30 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.राजेश मोरे यांनी दिली, तर गेल्या तीन ते चार दिवसांत 50 हून अधिक जणांवर कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश आणि प्रशासनाच्या मौनामुळे शहरातील नागिरकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- PM Modi Speech Highlight : 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण 3 जानेवारी सुरू : पंतप्रधान मोदी
- ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार सतर्क, महाराष्ट्रासह दहा राज्यांत विशेष पथकं पाठवणार
- अहमदनगर जिल्ह्यात नो वॅक्सिन नो एन्ट्री! ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha