सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली, विरोधकांना संशय
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांच्या तक्रारीचा अर्ज वाचून दाखवला. मनसुख हिरेन यांची गाडीतच हत्या करण्यात आली होती, असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरुन विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. विधानसभेत बोलताना फडणवीसांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा उल्लेख करत सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली आणि मृतदेह खाडीत फेकल्याचा संशय हिरेन यांच्या पत्नीने व्यक्त केला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सचिन वाझे यांच्या विरोधात पुरावे असतानाही त्यांना अटक का होत नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांच्या तक्रारीचा अर्ज वाचून दाखवला. मनसुख हिरेन यांची गाडीतच हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत फेकून देण्यात आला होता. खाडीत भरतीची वेळ असल्याने मनसुख हिरेन यांचा मृतदेह किनाऱ्यावर येणारच नाही, असा हत्यारांचा समज होता. मात्र खाडीत भरती न आल्याने मृतदेह किनाऱ्यावर आला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली पाहिजे अशी मागणी हिरेन यांच्या पत्नीने केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये दाखल झालेल्या एफआयआरची आठवण करुन दिली. यामध्ये दोघा जणांनी 40 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी दोन जणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. जामीन मिळालेल्यांमध्ये धनंजय विठ्ठल गावडे आणि सचिन वाझे यांचा समावेश आहे. हे दोघेही कोणत्या पक्षाचे आहेत, सर्वांना माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन आहे ते धनंजय गावडे यांच्या घराजवळ होतं आणि त्यांच्या 40 किमीवर हिरेन यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणात आणखी किती पुरावे हवे आहेत? असा सवाल फडणवीस यांनी विचारला.
मोहन डेलकर यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा- अनिल परब
देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सत्ताधाऱ्यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाईचे निर्देश दिले पाहिजेत. मोहन डेलकर यांना देखील न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी अनिब परब यांनी केली.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान थांबलं पाहिजे- नाना पटोले
मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल न होणे हा संशयाचा भाग आहे. तातडीने या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कट कारस्थान विरोधी पक्षाकडून सुरु आहे हे थांबलं पाहिजे, असं नाना पटोले यांनी म्हटलं.