कोरोना व इतर विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी देशातील पहिल्या 'विषाणू रक्षक' आयसोलेशन चेंबर्सची निर्मिती
कोरोनाबधित किंवा इतर कोणत्याही विषाणूबाधित रुग्णापासून विषाणू संसर्ग हा आरोग्य कर्मचारी, रुग्णाचे नातेवाईक यांना होऊ नये. यासाठी या आयसोलेटेड चेंबर्सची निर्मिती जेजे रुग्णलयाच्या सर्जरी डिपार्टमेंटच्या डॉक्टरांच्या टीमने केली आहे.
मुंबई : आज मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णलयात विषाणूपासून रक्षण व्हावं यासाठी देशातील पहिल्या 'विषाणू रक्षक प्रेशराईज चेंबर'चे उद्घाटन आज करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ तात्याराव लहाने यांच्या हस्ते या चेंबर्सचे उदघाटन करण्यात आले. कोरोनाबधित किंवा इतर कोणत्याही विषाणूबाधित रुग्णापासून विषाणू संसर्ग हा आरोग्य कर्मचारी, रुग्णाचे नातेवाईक यांना होऊ नये. यासाठी या आयसोलेटेड चेंबर्सची निर्मिती जेजे रुग्णलयाच्या सर्जरी डिपार्टमेंटच्या डॉक्टरांच्या टीमने केली आहे.
या चेंबरमध्ये विषाणूबाधित रुग्णावर सोनोग्राफीपासून व्हेंटिलेटरवर लावणे, इतर तपासणी व उपचार योग्य खबरदारी घेऊन करता येतात. शिवाय रुग्णाला एका जागेवरून दुसऱ्या जागी नेताना सुद्धा विषाणू संसर्गाची शक्यता इतरांना कमी असते. शिवाय, काही असे सुद्धा रुग्ण या आयसोलेशन चेंबर्समध्ये ठेवले जातात ज्यांना बाहेरील व्यक्ती पासून कोणताही संसर्ग होऊ नये, याची खबरदारी घेता यावी.
यामध्ये मुख्यत्वे करून पॉझिटीव्ह प्रेशर ज्यामध्ये बाहेरील हवा चेंबरच्या आतमध्ये येऊ शकत नाही. पॉझिटीव्ह प्रेशर मोडला चेंबरच्या आतमधील व्यक्तीला बाहेरील विषाणू संसर्ग होत नाही. तर निगेटिव्ह प्रेशर मोडवर आतील हवा किंवा त्यातील विषाणू हे बाहेर जात नाहीत. ते UV(ultraviolet rays)ने नष्ट केले जातात. चेंबरमध्ये 0.3 मायक्रोमीटर आकाराचे फिल्टर बसविले असून सुक्ष्मतील सूक्ष्म विषाणू याद्वारे नष्ट होतो. यामध्ये इबोला, कोरोना, टीबी व इतर बॅक्टेरियल संसर्गापासून रुग्णाचा बचाव होतो.
हे आयसोलेटेड प्रेशराईज चेंबर फ्रान्स, जर्मनी या देशात अशा प्रकारच्या चेंबर्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो व त्याची किंमत या देशात साधारणपणे 18 लाखापर्यंत आहे. तर मुंबईतील जेजे डॉक्टर्सच्या संकल्पनेतून तयार केलेला हा विषाणू रक्षक चेंबर 3 लाखामध्ये तयार करण्यात आला आहे.प्रायोगिक तत्वावर हे चेंबर मुंबईतील शासकीय रुग्णलयात वापरण्यात येणार असून त्याचा वापर पाहून भविष्यात याची संख्या वाढवली जाऊ शकते.