(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने मुंबईतील वरळी कोळीवाडा सील
कोरोना व्हायरस आता मुंबईतील मच्छिमारांच्या परिसरातही पसरला आहे. वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे पाच ते सहा संशयित रुग्ण आढळले आहेत.
मुंबई : मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर मुंबई पोलिसांनी सील केला आहे. कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं आहे. तसंच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण परिसराचं निर्जंतुकीकरण सुरु आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी, रुग्णवाहिका परिसरात दाखल झालेल्या आहेत. वरळी हा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे.
कोरोना व्हायरस आता मुंबईतील मच्छिमारांच्या परिसरातही पसरला आहे. वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे पाच ते सहा संशयित रुग्ण आढळले आहेत. या सर्व संशयिताचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त असल्याचं कळतं. विशेष म्हणजे या संशयितांनी परदेशवारी केली नव्हती किंवा ते कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्याही संपर्कात आले नव्हते.
वरळी कोळीवाडा हा अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे. इथे अनेक बैठ्या चाळी आहेत. परिणामी कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने पोलिसांनी तातडीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसर सील केला आहे. रविवारी (29 मार्च) रात्रीपासूनच इथे पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. पोलीस कोणालाही आत किंवा बाहेर जाऊ देत नाहीत. संपूर्ण परिसर निर्जंतुक केला जात आहे. शिवाय परिसरातील संपूर्ण दुकानं बंद करण्यात आली आहेत. एकंदरीत संचारबंदीची परिस्थिती वरळी कोळीवाड्यात आहे.
"नागरिक लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग गांभीर्याने घेत नाही. वारंवार आवाहन, विनंती करुनही लोक सोशल डिस्टन्सिंग तसंच लॉकडाऊनचे नियम पाळत नाही आणि घराबाहेर पडत आहेत. आम्ही कोळीवाड्यात निर्जंतुकीकरणाला सुरुवात केली आहे. पण लोकांनीही लॉकडाऊन पाळावा, नाहीतर व्हायरस पसरण्यास फार वेळ लागणार नाही," असं महापालिकेच्या जी दक्षिण प्रभागाचे सहाय्यक मनपा आयुक्त शरद उघाडे यांनी सांगितलं.
Coronavirus | Worli Koliwada परिसर पोलिसांकडून सील; कोरोनाचा संशयित आढळल्याने खबरदारी