मुंबई पालिकेच्या 117 अधिकाऱ्यांना कोरोना पावला? निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं
मुंबई महानगरपालिकेतील एकूण 117 निलंबित अधिकाऱ्यांना कोविडच्या नावाखाली मे 2020 मध्ये परत कामावर घेण्यात आले आहे.
![मुंबई पालिकेच्या 117 अधिकाऱ्यांना कोरोना पावला? निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं Coronavirus Mumbai Municipal Corporation 117 suspended officers were rehired मुंबई पालिकेच्या 117 अधिकाऱ्यांना कोरोना पावला? निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/09/29488949b9c88023f3f56a3d3fb292af_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोविडच्या काळातल्या आठवणी आता नकोशी झाली आहे. संकटाकाळी अनेकांनी संधी शोधत त्यात हात धुवून घेतलेत. आधी गैरकारभार, बेजबाबदारपणाचा ठपका बसल्यानं निलंबीत झालेले कर्मचारी आणि आता तेच अधिकारी या कोविड काळात मात्र, पालिकेसाठी पवित्र ठरलेत. चक्क 117 निलंबीत कर्मचार्यांना पालिकेनं कोविड काळात पुन्हा कामावर रुजू केले आहे.
मुंबई महानगरपालिकेतील एकूण 117 निलंबित अधिकाऱ्यांना कोविडच्या नावाखाली मे 2020 मध्ये परत कामावर घेण्यात आले आहे. यातील गंभीर बाब म्हणजे कमला मील आग दुर्घटना प्रकारातील निलंबीत दोन दोषी अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे. कोविड महामारी दरम्यान अधिकाऱ्यांची कमतरता भासत असल्याने आरोग्य विभागाशी संबंधित निलंबित अधिकाऱ्यांना परत घेण्याकरता आयुक्तांचे आदेश होते. मात्र, आरोग्य विभागाशी दूरदूरपर्यंत संबंध नसलेल्या विभागातूनही निलंबीत कर्चा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेने घनकचरा विभागातील 53, मुख्य अभियंता विभाग 23, पाणी, सुरक्षा आणि अग्निशामक विभागातून प्रत्येकी 6 निलंबित अधिकारी परत कामावर घेण्यात आले आहे. याव्यतिरिक्त 17 आरोग्य विभागातून तर एकूण सहा निलंबित अधिकारी तीन वेगवेगळ्या रुग्णालयातून परत कामावर घेण्यात आले आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच काळात म्हणजेच मे 2020 मध्ये पालिकेने आदेश काढून 75% कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणे बंधनकारक केले होते. जेणेकरून कोविड नियमांचे पालन होऊ शकेल. याच उलट पालिकेने घनकचरा व अभियांत्रिकी विभागातून निलंबित अधिकाऱ्यांना मनुष्यबळ कमी पडत आहे, म्हणून परत कामावर घेण्यात आले. त्यामुळे, कोविड ड्युटीच्या नावाखाली निलंबित अधिकाऱ्यांना परत कामावर घेण्यासाठी प्रयत्न जातोय असा आरोप विरोधकांनी केला आहे.
इतरांसाठी कठीण असलेला कोविड काळ निलंबीत अधिकारी आणि कर्मचा-यांना पावला आहे. माहिती अधिकारात नशिब फळफळलेल्या या निलंबीत कर्मचा-यांच्या नावांची यादी मात्र देण्यात आली नाही. एकीकडे कोविडनं अनेकांची आयुष्य आणि रोजगारही हिरावले. मात्र, बेरोजगारांना संधी देण्याऐवजी पालिकेनं पुन्हा बेजबाबदारांना संधी देण्यातच धन्यता मानलीय यातच सारे काही आले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)