Coronavirus | मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण
मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्टमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मुंबई : मुंबईसाठी धोक्याची घंटा समजणारी आणखी एक घटना समोर आली आहे. मुंबईची दुसरी लाईफलाईन अशी ओळख असलेल्या बेस्ट बसच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची लागण झालेला हा बेस्टमधील पहिला कर्मचारी आहे. या घटनेने चिंता वाढली आहे.
हा कर्मचारी मुंबईच्या वडाळा बस डेपोमध्ये विद्युत विभागात काम करतो. काही दिवसांपासून तो सुट्टीवर होता. हा कर्मचारी 21 मार्च रोजी शेवटचं वडाळा डेपोमध्ये ड्युटीसाठी हजर झाला होता. तर 26 मार्च रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बेस्ट बसमधूनच तो आपल्या घरापासून म्हणजेच टिळकनगरहून वडाळा बस डेपोपर्यंत प्रवास करत होता. सध्या त्याला मुंबईच्या एसआरव्ही रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
हा कर्मचारी मुंबईतील टिकळनगरमधल्या ज्या इमारतीत राहत होता, ती आता सील करण्यात आली आहे. सोबतच या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 14 दिवसांसाठी होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.
मुंबईची लोकल ट्रेनच्या सेवेनंतर बेस्ट बस ही शहरातील दुसरी लाईफलाईन समजली जाते. लोकल ट्रेन बंद केल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट बसची सेवा काही परिसरात सुरु होती. आता या बेस्टमधील कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण होणं ही मुंबईसाठी चिंतेची बाब आहे.