मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबतची बैठक; ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यात लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे. आता आपण लसीकरणात पुढे आहोत मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊ. पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत महत्त्वाची बैठक पार पडली. कोरोनाच्या मोठ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लान्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी. तसेच लसीकरण वाढवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससोबत ऑनलाईन बैठक घेतली. यात ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्य्यांवर विस्तृत चर्चा झाली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी. डॉ अविनाश सुपे, डॉ उडवाडिया, डॉ वसंत नागवेकर, डॉ राहुल पंडित, डॉ झहीर विराणी, डॉ ओम श्रीवास्तव, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव उपस्थित होते.
Remdesivir Injection | रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली, भारत सरकारचा मोठा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाशी लढा देताना सुविधा वाढवल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे. कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवत आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे कारण नसताना धोका निर्माण झाला आहे. लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती ( एसओपी ) तयार करण्यात येईल.
कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील
राज्यात लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे. आता आपण लसीकरणात पुढे आहोत मात्र आणखीही गती वाढवू आणि जास्तीत जास्त जणांना लस देऊ. पण हे लसीकरण आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी उपयुक्त ठरेल. आता या क्षणी असलेल्या लाटेला थांबवण्यासाठी आपल्याला कडक निर्बंध काही काळासाठी का होईना लावावेच लागतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
रेमडीसीव्हीरचा अवाजवी वापर थांबण्यावर चर्चा
आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागवण्याची कार्यवाही करावी यावरही चर्चा झाली. रेमडेसिवीरचा अति व अवाजवी वापर थांबवणे देखील गरजेचे आहे, असं मत टास्क फोर्सने व्यक्त केले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी देखील बोलताना आपण रेमडेसिवीरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता ते ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे, रेमडेसिवीर संदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढवणे यावर कार्यवाही झाली आहे अशी माहिती दिली.