(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Remdesivir Injection | रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली, भारत सरकारचा मोठा निर्णय
रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेत भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणानंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा राज्यात जाणवत होता. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेत भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली आहे. देशातील कोरोना स्थिती सुधारेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.
Export of injection Remdesivir and Remdesivir Active Pharmaceutical Ingredients (API) prohibited till the COVID19 situation in the country improves: Government of India pic.twitter.com/KLENjzTNyn
— ANI (@ANI) April 11, 2021
देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. अनेक ठिकाणी खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पूर्णपणे संपला होता. त्यामुळे भारत सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शन निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक कंपन्या ज्या रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन करतात त्यांना इंजेक्शनच्या साठ्याविषयीची माहिती वेबसाईटवर ठेवावी लागणार आहे. तसेच कोणत्या डीलरकडून डिस्ट्रिब्युशन होत आहे त्याची माहितीही कंपन्यांना द्यावी लागणार आहे.
औषध निरीक्षक आणि इतर संबंधित आधिकाऱ्यांना रेमडेसिवर इंजेक्शनच्या साठ्याविषयी सातत्याने माहिती द्यावी लागणार आहे. साठेबाजी, काळाबाजार कसा रोखता येईल यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना काम करावं लागणार आहे. राज्यांचे आरोग्य सचिव यांना रेमडेसिवीर इंजेक्शनच्या साठ्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे.
Remdesivir : रेमडेसिविरचा काळाबाजार! आता जिल्हास्तरावर कंट्रोल रुम, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
रेमडेसिवीर इंजेक्शनचा होत असलेला काळाबाजार पाहून आता जिल्हास्तरावर कंट्रोल रुम तयार केले जाणार आहेत. राज्य आरोग्य सेवा आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. रेमडेसिवीरची मागणी वाढत आहे. त्यात खासगी दुकानदार जास्त किंमत लावत आहेत. त्यामुळे सध्या ऑक्सिजन कंट्रोल रूममध्ये रेमडेसिवीरबाबत तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. त्याचे निराकरण स्थानिक FDA च्या कार्यालया मार्फत होणार आहे. जिल्हा स्तरावर तांत्रिक समिती गठीत करून त्या मार्फत रॅन्डम पद्धतीने खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर उपयोग नीट होत आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे. रेमडेसिवीरची गरज भासल्यास राज्यस्तरावरील FDA च्या कंट्रोल रूमशी संपर्क करून कारवाई होणार आहे. जिल्हास्तरावर यासाठी कंट्रोल रूम स्थापन केली जाणार असल्याची माहिती आहे.