केबल चालकांकडून तीन महिन्यांची रक्कम वाहिन्यांनी घेऊ नये ; मनसे केबल सेनेची मागणी
अनेक सोसायटयांनी केबल सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोसायट्यांमध्ये पैसे घेण्यासाठी येण्यास बंदी घातलीय. त्यामुळे केबल व्यावसायिक आणि मल्टिपल सिस्टिम ऑपरेटर आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे
मुंबई : पुढील तीन महिन्यांसाठी केबल चालक आणि मल्टिपल सिस्टिम ऑपरेटर यांच्याकडून घेण्यात येणारी रक्कम सर्व वाहिन्यांनी पुढील तीन महिन्यांसाठी घेऊ नये. यासाठी भारतीय दूरसंचार नियामक खात्याने वाहिन्यांसाठी पत्रक काढावे अशी मागणी मनसे केबल सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. लॉकडाऊन जाहीर होऊन आता जवळपास 20 दिवस उलटत आले आहेत. एकीकडे कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस मोठया संख्येने वाढतोय. तर दुसरीकडे अनेक सोसायटयांनी केबल सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोसायट्यांमध्ये पैसे घेण्यासाठी येण्यास बंदी घातलीय. त्यामुळे केबल व्यावसायिक आणि मल्टिपल सिस्टिम ऑपरेटर आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत मनसे केबल सेनेच्या वतीने मागणी करण्यात आलीय, अशी माहिती संघटनेचे प्रमुख परेश तेलंग यांनी दिलीय.
याबाबत बोलताना परेश तेलंग म्हणाले की, सध्या राज्यात लॉकडाऊन आणखी किती दिवस वाढेल याबाबत अद्याप काही माहिती नाही. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिक देखील घाबरलेले आहेत. त्यामुळे अनेक सोसायट्या किंवा चाळीमध्ये केबलचे पैसे घेण्यासाठी येणाऱ्यांना बंदी घातली आहे. त्यामुळे असे अनेक केबल चालक आणि ऑपरेटर आहेत. ज्यांना अद्याप ग्राहकांकडून पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे या सर्वांचा विचार करून वाहिन्यांनी केबल चालक आणि ऑपरेटर यांच्याकडून पैसे घेण्यासाठी मुदतवाढ द्यावी, यासाठी ट्राय ने आदेश काढावेत अशी मागणी केबल सेनेने केली आहे.
या सोबतचं सध्या राज्यातील काही केबल संघटनांनी ' शुल्क वाहिन्या' घेणाऱ्या ग्राहकांनी टाळेबंदी नंतर दोन ते तीन महिन्यांत मासिक तीन महिन्यांचे शुल्क न भरल्यास अतिरिक्त 30 रुपये शुल्क आकारण्याचं जाहीर केलं आहे. अशा पद्धतीने ग्राहकांची लूट करणं चुकीचं आहे. सध्या धारावी, वरळी सारख्या अनेक असे परिसर आहेत. जिथं मोलमजुरी करून खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा ग्राहकांना सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मासिक मोफत वाहिन्यांसाठीचं शुल्क भरण अवघड झालं आहे. अशावेळी जादा शुल्क ग्राहकांकडून घेणं चुकीचं आहे. आशा पद्दतीने पैसे घेण्यासाठी आपली संघटना सहमत नसल्याचं तेलंग यांनी म्हंटल आहे.
BMC | वॉर्डबॉय भरतीसाठी मुंबई महापालिकेची जाहिरात, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांंमुळे मनपा रुग्णालयावर ताण