(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Local Train : पावसामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा! कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत रेल्वे सेवा ठप्प; CSMT ते डोंबिवली लोकल सुरु
CSMT to Dombivali Local Update : मुंबईतील मुसळधार पावसामुळे कल्याण-कसारा रेल्वे सेवा ठप्प असून गेल्या साडे-चार तासांपासून कल्याण-कर्जत रेल्वे सेवाही बंद आहे.
Mumbai Local Train Update : मुंबईला पावसाने (Mumbai Heavy Rain) झोडपलं असून याचा फटका मुंबईच्या लाईफलाइनला बसला आहे. मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. कल्याण-कसारा रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर सुमारे साडे-चार तासांपासून कल्याण-कर्जत रेल्वे सेवाही बंद आहे. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहे. राज्यासह मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. आज पावसाचा जोर वाढल्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.
तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेवर परिणाम
मध्य रेल्वेने याबाबत ट्विट करत माहिती देत सांगितलं आहे की, मुसळधार पावसामुळे कल्याण स्थानकात 14.40 वाजेपासून पॉइंट निकामी झाले. तांत्रिक बिघाडामुळे कल्याणहून कसारा बाजूने जाणाऱ्या आणि कसारा बाजूने येणाऱ्या गाड्या बंद आहेत. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने वाहतूक पूर्ववत करण्यात अडथळे येत असल्याचं सांगितलं जात आहे.
मागील 3 तासांत कल्याण, डोंबिवलीत धुव्वाधार पाऊस
मागील 3 तासांत कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. विठ्ठलवाडी परिसरात मागील 3 तासांत 57 मिमी पाऊस तर कल्याण शहरात 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तिकडे, डोंबिवली परिसरात देखील मागील 3 तासांत 49 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार, ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेवर परिणाम
बदलापुरात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा दणका मध्य रेल्वेला बसला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातून एकही रेल्वे मुंबईच्या दिशेने रवाना होणार नाही अशी सूचना प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रवाशांना माघारी परतावं लागलं आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे. बदलापूर फलाट क्रमांक 1 वर मुंबई साठी जाणाऱ्या लोकलमध्ये बसलेल्या, उपचारासाठी सायन रुग्णालयात जाणाऱ्या महिलेला याचा फटका बसला आहे. रुग्णालयात दाखल होण्यासाठी निघालेल्या या महिलेला आता पुन्हा घरी माघारी फिरावं लागत आहे.
सीएसएमटी ते डोबिंवलीकडे जाणारी वाहतूक सुरु
डोंबिवलीपासून पुढील रेल्वे सेवा सुरु आहे. मात्र, या मार्गावरील रेल्वे सेवा उशिराने सुरु आहे. यामुळे मध्ये रेल्वेच्या कल्याण, डोबिंवली आणि ठाणे स्थानकांवर तुफान गर्दी झाली आहे. मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेन आता उशिरानं धावत आहेत. तर अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे वाहतूकदेखील बंद आहे.
पनवेल ते बेलापूर वाहतूक संथ गतीने
लोकलचं वेळापत्रक कोलमडलं असून पावसाचा हार्बर रेल्वेलाही मोठा फटका बसला आहे. पनवेल ते कुर्ला दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती, पण आता वाहतूक सुरु झाली असली तरी रेल्वे सेवा संथ गतीने सुरु आहे.