(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Heavy Rain : पावसानं झोडपलं! मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट, दोन दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार
Mumbai Orange Alert : मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांत रेड अलर्ट देण्यात आला आहे.
Mumbai Monsoon Update : मुंबई (Mumbai) सह राज्याला पावसानं झोडपलं आहे. हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट (Mumbai Orange Alert) जारी करण्यात आला आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत मंगळवारपासूनच पावसाने हजेरी लावली असून आज, बुधवारी पावसाचा जोर वाढवला आहे. मुंबईत पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईला ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस पावसाचा जोर अजूनही वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांना पावसामुळे रेड अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच मुंबईत पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे.
मुंबई दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह राज्यातही पावसाचा जोर वाढला आहे. राज्यात पुढील चार दिवस पाऊस वाढणार आहे. 19 आणि 20 जुलैला मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट तर. 21 आणि 21 जुलैला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
18 Jul, पुढील ५ दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 18, 2023
कृपया पहा pic.twitter.com/n2ZpEgXieW
मुंबईत एनडीआरएफच्या 5 टीम तैनात
हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे मुंबईस राज्यातील प्रशासन आणि यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. मुंबईसह राज्यात एनडीआरएफ आणि प्रशासन सज्ज झालं आहे. महाराष्ट्रात एनडीआरएफच्या एकूण 12 तुकड्या कार्यरत आहेत. यामध्ये मुंबई आणि नागपुरातील रिजनल रिस्पाॅन्स सेंटरवर एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत एनडीआरएफच्या एकूण 5 टीम तैनात करण्यात आल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे. यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील एनडीआरएफ तैनात करण्यात आलं आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, नागपूर आणि ठाण्यात एनडीआरएफ तैनात पथकं सज्ज झाली आहेत.
राज्यात चार दिवस पावसाचा अंदाज
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणासह मध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.