Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये...
Shiv Bhojan Thali : महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांना बदलण्याचा सपाटाच शिंदे सरकारकडून लावला असतानाच शिवभोजन थाळी मात्र सुरु ठेवण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
Shiv Bhojan Thali : महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांना बदलण्याचा सपाटाच शिंदे सरकारकडून लावला असतानाच शिवभोजन थाळी मात्र सुरु ठेवण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. शिवभोजन थाळी बंद होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र, या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे. शिवभोजन थाळी संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीमध्ये आज चर्चा झाली. शिवभोजन थाळी सुरुच राहणार असली, तरी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा आढावा घेणार आहेत.
राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागातील केंद्रचालकांना एका थाळीमागे 50 रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना 35 रुपये अनुदान देण्यात येत होते.
थाळीत गैरव्यवहार झाल्याचा संशय
दरम्यान, शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारचा कयास आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती. या योजनेतंर्गत राज्यातील जनतेला 10 रुपयांत जेवण मिळत होते. कोरोना काळात याची किंमत 5 रुपये करण्यात आली होती. या योजनेमुळे गरिबांना मोठा आधार मिळत होता.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने कारभार हाती घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे.
शिवभोजन थाळी योजना काय होती?
गरिबांना, गरजूंना सहज व अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करण्यासाठी राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले होते. शिवभोजन थाळी केंद्र स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, हॉटेल चालक आदींना चालवण्यासाठी देण्यात आली आहेत. शिवभोजन थाळी केंद्र चालकांना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. शिवभोजन थाळीत एक वाटी भाजी, दोन चपात्या, भात व वरणाचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या