BMC: मुंबई पालिकेत कोरोना प्रतिबंधात्मक लशींचा तुटवडा, मुंबई पालिकेचं राज्य सरकारला पत्र
CoronaVirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयारी आणि नियोजन केले जात असताना पुन्हा एकदा लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.
मुंबई: जगभरात कोरोनाचा (CoronaVirus) प्रसार पुन्हा सुरु झाला आहे. यामुळे पुन्हा कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच केंद्र सरकारने देखील बूस्टर डोस (Booster Dose) घेण्याचं आवाहन केले आहे. मात्र मुंबई महापालिकेकडे (Mumbai Muncipal Corporation) लसींचा तुटवडा असल्याने लशींचा पुरवठा करा, अशी मागणी करणारे पत्र मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारला लिहिले आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यात दिलेल्या टार्गेटप्रमाणे दोन्ही डोस 100 टक्के देण्यात आले. त्यानंतर मात्र मुंबई महापालिकेला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा भासत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयारी आणि नियोजन केले जात असताना पुन्हा एकदा लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.
जगभरात कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असले तरी मुंबईत सध्या बीएफ 7 व्हायरसचा धोका नाही. बीएफ 7 चा रुग्ण मुंबईत सप्टेंबर मध्ये आढळला होता. पण मुंबईकराची हर्ड इम्युनिटी अधिक असल्याने तो पसरला नाही . मुंबईत पहिला आणि दुसरा डोस घेतल्याने 97 टक्के लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी तयार आहे. मुंबईत कोणतंही चिंतेचं वातावरण नाही असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्तांनी दिले आहे.
मुंबई महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष सूचना आणि गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. मुंबई महापालिकेनं कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी सूचना (Mumbai Corona Virus Updates Guideline of Bmc )देण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कोव्हिड संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असं आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आलं आहे.
देशभरात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. मुंबईत 2011 च्या जनसंख्येच्या नोंदी प्रमाणे 1 कोटी 30 लाख नागरिक आहेत. त्यामधील 94 लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट सरकाराने पालिकेला दिले होते. पालिकेने 1 कोटी 8 लाख 89 हजार 721 नागरिकांना लसीचा पहिला, 98 लाख 8 हजार 748 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबईमध्ये केवळ 14 लाख 48 हजार 785 नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे. त्यामुळे अद्यापही 83 लाख 59 हजार 963 नागरिक बूस्टर डोसपासून लसीपासून वंचित आहेत.
संबंधित बातम्या:
Mumbai Corona: मुंबईकरांनो सावधान! राजधानीत कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेच्या विशेष सूचना