(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अंबरनाथमध्ये उभारणार मुंबई महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड
मुंबईच्या कचऱ्यासाठी देवनार डम्पिंग ग्राउंड कमी पडू लागल्यानं मुंबई महापालिकेनं अंबरनाथ तालुक्यात 100 एकर सरकारी जागा घेतली आहे.
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये मुंबई महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड उभं राहणार आहे. मुंबईच्या कचऱ्यासाठी देवनार डम्पिंग ग्राउंड कमी पडू लागल्यानं मुंबई महापालिकेनं अंबरनाथ तालुक्यात 100 एकर सरकारी जागा घेतली आहे. यासाठी महसूल विभागाला 10 कोटी रुपयांचा महसूलही मिळाला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील करवले गावातील जागेवर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असून त्यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यामुळे याठिकाणी आता संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. गावकऱ्यांचा विरोध मावळेल, अशी आशा प्रशासनाला असून त्यासाठी सध्या बैठकाही सुरू आहेत.
करवले गावाशेजारी असलेल्या कातकरी पाड्यात 79 आदिवासी कुटूंब वास्तव्याला आहेत. 550 लोकसंख्या असलेल्या या पाड्यात शाळा, मंदिरं, तबेले आणि आदिवासींची कौलारू घरं आहेत. डम्पिंग ग्राउंडसाठी मुंबई महापालिकेनं घेतलेल्या जागेत या आदिवासी पाड्याचाही समावेश आहे.
स्थानिक आदिवासी बांधवांच्या स्थलांतराची तयारी मुंबई महापालिकेनं दाखवली आहे. आदिवासी बांधवांनी मात्र हे गाव सोडायला नकार दिला. काहीही झालं तरी आम्ही गाव सोडणार नाही. डम्पिंगसाठी जागा देणार नाही, अशी भूमिका येथील आदिवासी बांधवांनी घेतली आहे.
गावातील आदिवासी बांधव पिढ्यांपिढ्या याठिकाणी राहत आहेत. मात्र आता या वयात जायचं कुठे? आणि करायचं काय? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. आता त्यांच्या या व्यथेची सरकार दखल घेणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.