भाजपने आमदार-खासदारांना सोपवलं 'रिपोर्ट कार्ड'
आता निवडणूक झाली तर संबंधित आमदार आणि खासदार यांना किती मते मिळतील याची माहितीच भाजपने लोकप्रतिनिधींना सोपवली.
![भाजपने आमदार-खासदारांना सोपवलं 'रिपोर्ट कार्ड' BJP MP and mla's meeting updates भाजपने आमदार-खासदारांना सोपवलं 'रिपोर्ट कार्ड'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/09233532/BJP-meeting.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची आमदार-खासदारांची बैठक आज पार पडली. भाजपच्या या बैठकीत प्रत्येक लोकप्रतिनिधींना त्यांचे 'रिपोर्ट कार्ड' सोपवण्यात आले. जर आता निवडणूक झाली तर संबंधित आमदार आणि खासदार यांना किती मते पडतील याची माहितीच भाजपने लोकप्रतिनिधींना सोपवली.
भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या देखरेखेखाली मतदारसंघ निहाय सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये जर आता निवडणूक झाली तर कोणाला किती मते मिळतील?, पहिल्यापेक्षा कमी किंवा जास्त मते का मिळाली?, गेल्या 4 वर्षात कोणते कार्यक्रम राबवले गेले?, मतदार संघात काय करायची गरज आहे? याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
या सर्वेक्षणावरून मतदार संघातील परिस्थितीचा अंदाज संबंधित भाजपाच्या लोकप्रतिनिधींना देण्यात आला आहे.
या बैठकीत भाजपची संघटनात्मक बांधणीबाबतही चर्चा झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. याशिवाय मतदार यादीत नवीन नावं नोंदवण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यामुळे आपल्या मतदार संघात मतदारांच्या नाव नोंदणीसाठी आमदारांना सक्रिय होण्यास सूचना देण्यात आल्याचंही रावसाहेब दानवेंनी सांगितलं.
याशिवाय दुष्काळाचा आढावा घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मंत्र्यांना दुष्काळी परिस्थितीची माहिती घेण्याचे आदेश परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तसेच लवकरात लवकर याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)