अजित पवारांची सीबीआय चौकशी करा, चंद्रकांत पाटील यांचं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र
चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.

मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याआधी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मंजूर केल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रात काय म्हटलंय?
- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहेत. सीबीआयतर्फे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
- भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा केला होता ठराव. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण मागणी करत आहोत.
- महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बेकायदेशीरपणे पैसे वसुली हाच सरकारचा कारभार आहे
- अजित पवार यांनी दर्शन घोडावत यांच्याकडून कोट्यावधीची वसुली करून घेतली, असा सचिन वाझेंनी आरोप केला आहे
- सचिन वाझे हे अनिल परब यांच्यासाठीही वसुली करत होते.
- महापालिकेतील अनेक कंत्राटदारांना वसुलीसाठी अनिल परब यांनी सचिन वाझेकडून धमकी दिली.
- पन्नास कंत्राटदाराकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले.
- सैफी बुर्हानी ट्रस्टची चौकशी करून त्यांच्या संचालकांकडून पन्नास कोटी खंडणी वसूल करण्याचा टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं.
- अजित पवार, अनिल परब आणि दर्शन घोडावत यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, ही तक्रार कुठल्याही राजकीय अजेंड्यासाठी नाही.
- महाराष्ट्रातील जनतेचा कायद्यावरील विश्वास उडत चालला आहे. याची गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी.
भाजप कार्यकारिणीत नेमका काय ठराव मांडला होता?
भाजप कार्यकारणीत मांडलेल्या ठरावात म्हटलं आहे की, सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याच्या ऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीरसिंग यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी ही कार्यकारिणी करत आहे, असा ठराव मांडला होता.
आधी भाजप कार्यकारिणी अजित पवारांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली आणि आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी थेट अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप राष्ट्रवादी विरोधात संघर्ष करायच्या तयारीत दिसत आहे. 2014 पूर्वी भाजप सत्तेत असताना सिंचन घोटाळ्यावरून भाजपनं अजित पवारांविरोधात रान उठवलं होतं आणि आता पुन्हा एकदा भाजप विरोधी पक्षात असताना अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे.























