(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भिवंडीत महापौर चषक 2021 स्पर्धेत कोरोनाचे नियम पायदळी, प्रशासनाचं जाणूनबुजून दुर्लक्ष?
भिवंडीत पाच वर्षानंतर भव्य महापौर चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आयोजक आणि खेळाडूंकडून कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं.
भिवंडी : कोरोना बाधित रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहेत. अशा स्थितीत कोरोनाचे संबंधिच्या नियामांचं काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. मात्र अनेक भिवंडी महापौर चषक 2021 मध्ये आयोजक, खेळाडू आणि इतरांकडून कोरोनाचे नियम अक्षरश: पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळालं. क्रीडांगणात कोरोनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन होत असून पोलिस व मनपा प्रशानाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. महापौर, उपमहापौर यांच्यासह नगरसेवक देखील विनामास्क याठिकाणी आढळले.
भिवंडीत पाच वर्षानंतर भव्य महापौर चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भिवंडी शहर व तालुक्यातील क्रिकेटपटूंना चॅलेंज ग्राऊंडवर क्रिकेट खेळण्यांचं स्वप्न असतं. त्यामुळे या चषकाची सर्व क्रिकेट खेळाडू आतुरतेने वाट पाहत असतात. भिवंडी महापौर चषकाचे यंदाचे 32 वे वर्ष आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून तब्बल 120 संघांनी यात सहभाग घेतला होता.
एकीकडे महापालिका प्रशासन कोरोना नियमांचे उल्लंघन व गर्दी करणाऱ्यांवर तसेच मास्क न लावणार्यांवर दंडात्मक कारवाई करत आहे. तर पोलिस विभागाकडून देखील नाकाबंदी करून कारवाई केली जात आहे. मात्र माघील 14 दिवसांपासून सुरू असलेल्या महापौर चषकादरम्यान कोरोनाबाबत सर्व नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केलं जात आहे. असं असतानाही संबंधितांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे या स्पर्धेत महापौर प्रतिभा पाटील, उप महापौर इमरान वली मोहम्मद खान, नगरसेवक संतोष शेट्टी, विकास निकम हे विनामास्क दिसून आले. तर हजारो प्रेक्षकांनी क्रीडांगणात गर्दी केल्याने सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.
भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्या आदेशानुसार शहरात कोरोना नियम पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. असं असताना या स्पर्धेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रात्र आणि दिवस असे दोन पथक तयार करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. मात्र पालिका व पोलिस प्रशासनाकडून या स्पर्धेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले का? एकीकडे सर्वसाधारण नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते मात्र सर्व नियमांचे उल्लंघन करून हजारोंच्या संख्येने गर्दी जमवणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.