(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, मुंबईत 119 दिवसांनी 1000 हून जास्त रुग्ण
राज्यात आज 8807 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर आज 2772 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकूण 20 लाख 08 हजार 623 रुग्ण बरे घरी परतले आहेत. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 59 हजार 358 आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70 टक्के झालं आहे.
मुंबई : एकीकडे देशभरात कोरोना लसीकरणाचं अभियान सुरु आहे, दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. आज (24 फेब्रुवारी) पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. मागील 24 तासाच महाराष्ट्रात 8 हजार 807 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोबतच आज कोरोनामुळे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 2772 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकूण 20 लाख 08 हजार 623 रुग्ण बरे घरी परतले आहेत. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 59 हजार 358 आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70 टक्के झालं आहे.
महाराष्ट्रात काल (23 फेब्रुवारी) दिवसभरात 6 हजार 218 कोरोनाबाधितांची वाढ झाली होती तर 51 जणांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात आज मागील वर्षी 18 ऑक्टोबरनंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. 18 ऑक्टोबर रोजी राज्यात 9 हजार 060 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.
महाराष्ट्रात मागील सात दिवसात नोंद झालेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर नजर टाकूया
24 फेब्रुवारी - 8807 रुग्ण, 80 जणांचा मृत्यू 23 फेब्रुवारी - 6218 रुग्ण, 51 जणांचा मृत्यू 22 फेब्रुवारी - 5210 रुग्ण, 18 जणांचा मृत्यू 21 फेब्रुवारी - 6971 रुग्ण, 35 जणांचा मृत्यू 20 फेब्रुवारी - 6281 रुग्ण, 40 जणांचा मृत्यू 19 फेब्रुवारी - 6112 रुग्ण, 44 जणांचा मृत्यू 18 फेब्रुवारी - 5427 रुग्ण, 38 जणांचा मृत्यू
मुंबईत 119 दिवसांनंतर एक हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही 119 दिवसांनंतर एक हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज 1 हजार 167 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे मुंबईत आज चार जणांनी प्राण गमावले. मुंबईत काल म्हणजे 23 फेब्रुवारीला 643 नवे रुग्ण समोर आले होते. त्याआधी 22 फेब्रुवारीला 760, 21 फेब्रुवारीला 921 रुग्ण आणि 20 फेब्रुवारीला 897 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले होते.
धारावीत आज 10 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले याशिवाय मुंबईतील धारावीमध्येही आज कोरोनाबाधितांची संख्या दोन आकडी असल्याचं समोर आलं आहे. आज धारावीत दहा कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यासोबतच धारावीमधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 हजार 041 झाली असून त्यापैकी 33 अजूनही सक्रिय आहेत. याआधी 17 जानेवारीला धारावीत दहा रुग्ण आढळले होते. त्यानंतर धारावीतील नव्या रुग्णांच्या संख्येने दुहेरी आकडा गाठला नव्हता. इतकंच नाही तर धारावीत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही, असंही घडलं होतं. धारावीच कोरोनाग्रस्तांची संख्या शून्य ते पाचच्या दरम्यान होती. परंतु आज दहा रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.