(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccine Drive | 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस, सरकारी केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रांवर पैसे मोजावे लागणार
केंद्र सरकारने कोरोना लसीकरण मोहिमेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसंच 45 वर्षांपेक्षा जास्त वय आणि प्रकृती गंभीर असलेल्यास नागरिकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु होणार आहे.
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण अभियानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पोलीस आणि शिक्षकांचं लसीकरण पार पडलं. आता 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. या टप्प्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेले 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास प्राधान्य देण्यात येईल.
या लसीकरणासाठी दहा हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. सरकारी केंद्रांवर कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे. तर खासगी रुग्णालयामध्ये लस घेणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहे. इथे मिळणाऱ्या लसीसाठी किती पैसे मोजावे लागतील याबाबत उत्पादक आणि रुग्णालयांशी चर्चा करुन आरोग्य मंत्रालय तीन ते चार दिवसात निर्णय घेईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
Starting 1st March, senior citizen and people over 45 but with comorbidities, can get vaccinated at over 10,000 Govt. centers and about 20,000 private centers; Vaccination at all Govt. centers will be free: Union Minister @PrakashJavdekar pic.twitter.com/5ZBbqi1Ljc
— PIB India (@PIB_India) February 24, 2021
सरकार सेल्फ रजिस्ट्रेशनची सूट देण्याची शक्यता भारतात 60 वर्षांवरील जास्त वय असणाऱ्या आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना लसीसाठी सेल्फ रजिस्ट्रेशर करण्याची परवानगी मिळू शकते.कोणत्या ठिकाणी लस घ्यायची आहे हे निवडण्याचा पर्यायही त्यांना मिळणार आहे. यासाठी मोबाईल अॅपमध्ये बदल करण्यात आले आहेत. सुरुवातील 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांनांच परवानगी देणार असल्याचं म्हटलं होतं. पण नंतर ही वयोमर्यादा वाढवून 60 वर्षे करण्यात आली कारण त्यांना धोका अधिक आहे. लसीकरणाचं प्रमाणपत्र Co-WIN अॅप आणि डिजिलॉकर यांसारख्या सरकारी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.
आतापर्यंत 1.21 कोटी जणांचं लसीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी सकाळपर्यंत 1,21,65,598 नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यापैरी 64,98,300 आरोग्य कर्मचारी (पहिला डोस), 13,98,400 आरोग्य कर्मचारी (दुसरा डोस) आणि 42,68,898 फ्रण्टलाईन कर्मचारी (पहिला डोस) समावेश आहे. फ्रण्टलाईन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला दोन फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मंत्रालयाने सांगितलं की, 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 75 टक्क्यांहून अधित आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे. यात बिहार, त्रिपुरा, ओदिशा, गुजरात, छत्तीसगड, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानचा समावेश आहे.