(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandup Dream Mall Fire : भांडुप हॉस्पिटल आग प्रकरणी गुन्हा दाखल, HDILचे राकेश वाधवानांसह नातेवाईकांविरोधात गुन्हा
Bhandup Dream Mall Fire : भांडुप येथील ड्रीम मॉल येथे लागलेल्या अग्नितांडवाने 11 रुग्णांचा जीव घेतला आहे. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रीम्स मॉल मॅनेजमेंटमधील एचडीआयएलचे चेअरमन राकेश वाधवानसह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉल येथे लागलेल्या आगीला 36 तास उलटून गेले आहेत. या अग्नितांडवाने 11 रुग्णांचा जीव घेतला आहे. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रीम्स मॉल मॅनेजमेंटमधील एचडीआयएलचे चेअरमन राकेश वाधवानसह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडुप पोलिस ठाण्यात राकेश वाधवान यांच्यासह अन्य काही जणांविरोधात कलम 304, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार या प्रकरणात ड्रीम्स मॉल मॅनेजमेंटमधील राकेश वाधवान (HDIL चेअरमन), निकिता त्रेहान (राकेश वाधवान यांची मुलगी), सारंग वाधवान (राकेश वाधवान यांचे भाऊ), दीपक शिर्के आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सनराईज ग्रुप मॅनेजमेंटमधील प्रिविलेज हेल्थकेयरच्या अमित त्रेहान (राकेश वाधवान यांचा जावई), निकिता त्रेहान (राकेश वाधवान यांची मुलगी) आणि स्वीटी जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हा ड्रीम्स मॉल HDIL ने 2009 मध्ये बनवला आहे. HDILचे चेअरमन राकेश वाधवान यांची मुलगी निकिता त्रेहान सनराईज ग्रुपची MD आहे. ज्यांचं हॉस्पिटल ड्रीम्स मॉलमध्ये होतं. कोविड काळात अटीशर्तींसह त्यांना कोविड हॉस्पिटल बनवण्याची परवानगी 31 मार्च 2021 पर्यंत मिळाली होती.
या प्रकरणातील राकेश वाधवान, सारंग वाधवान हे HDIL केसमध्ये तसेच PMC बॅंक घोटाळ्यात आरोपी आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात वाधवान यांचा परिवार महाबळेश्वरला गेला होता. या प्रकरणात गृह विभागाच्या तत्कालीन सचिवांनी दिलेल्या पत्रावरुन चांगलाच गोंधळ उडाला होता.
Bhandup Fire : मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट, दोषींवर तत्काळ कारवाईचे निर्देश
आगीच्या कारणांबाबत सर्वंकष चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश
भांडुप येथील ड्रीम्स मॉल मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदले यांना पुढील पंधरा दिवसात आगीबाबत व आगीच्या कारणांबाबत सर्वंकष चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
अग्नितांडवाने 11 रुग्णांचा जीव घेतला
भांडुप येथील ड्रीम मॉल येथे लागलेल्या आगीवर पूर्णपणे आता नियंत्रण मिळविण्यात आले असून आता कुलिंग प्रक्रिया आणि सर्च ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत या अग्नितांडवाने 11 रुग्णांचा जीव घेतला आहे. या आगीत गोविंदलाल दास(80) , झवेरचंद निसार(74), राजेंद्र मुणगेकर(66), सुनंदा बाई आबाजी पाटील(58) त्यांचे पती आबाजी पाटील(65), सुधीर लाड(66), मंजुलाबेन बारभाई(86), श्याम भक्तानी(75), महादेवन अय्यर(79), हरीश सचदेव(60) आणि एक अज्ञात पुरुष असे एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आता या ठिकाणी अग्निशमन दलाचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. शेकडो दुकाने खाक झाली असून मॉल बेचिराख झाला आहे.तीस तास उलटून गेल्यावर आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी सर्व खाक झाले आहे.