मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप -शिवसेनेत धुसफूस, मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता
येत्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद किंवा दोन मंत्रीपदं अशी ऑफर भाजपकडून दिली गेली आहे. सुभाष देसाईंचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे आल्याने शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मुंबई : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आमदारांना मातोश्रीवर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना हा निरोप दिला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंना निवडणुकीत उतरण्याचा आग्रह आमदारांकडून केला जाण्याची शक्यता आहे.
येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शिवसेना आमदार एकवटले आहेत. या एकजुटीतून त्यांना योग्य तो संदेश पक्षनेतृत्वापर्यंत पोहोचवायचा आहे, असंही बोललं जात आहे. या आमदारांचं नेतृत्व शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे करताना दिसत आहेत.
शिवसेनेला आगामी मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेत उपमुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी सुभाष देसाई यांचं नाव चर्चेत आहे. परंतु सुभाष देसाई यांच्या नावाला काही नेत्यांचा विरोध होताना दिसत आहे.
विधानपरिषदेवर निवडून गेलेल्या आमदारांना मंत्रिपदासाठी अधिक संधी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाेकांमधून निवडून विधानसभेवर गेलेले पक्षाचे आमदार नाराज हाेते.
त्यामुळे विधानपरिषेदतील शिवसेनेच्या ज्या आमदारांना मंत्रिपदं दिली आहेत, त्यांना पुन्हा संधी देऊ नये, असा संदेश आमदारांनी आपल्या एकजुटीतून दिला आहे. लोकांमधून निवडून आम्ही विधानसभेत गेलो आहोत, मात्र आम्हाला योग्य सन्मान दिला जात नसल्याची भावना या आमदारांमध्ये असल्याचं समोर येत आहे.
मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
येत्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद किंवा दोन मंत्रीपदं अशी ऑफर भाजपकडून दिली गेली आहे. आता ही पदं कुणाला द्यायची याचा निर्णय उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे. सुभाष देसाईंचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे आल्याने शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांनी लॉबिंग सुरु केलं आहे.
तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिवसेनेसोबत भाजपमध्येही धुसफूस पाहायला मिळत आहे. मंत्रिपदं, उपमुख्यमंत्री पद आणि विभागांचं वाटप निश्चित होत नाहीत, तोपर्यंत विस्तारावर निर्णय नको. आयात नेत्यांना विस्तारात प्राधान्य मिळत असल्याने दोन्ही पक्षात अंतर्गत कलह सुरू झाला आहे. हीच कारणे आहेत की मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे.
आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?
काल युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत केलेली होर्डिंग्जबाजी सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्र वाट पाहतोय.. असा उल्लेख युवासेनेच्या होर्डिंगवर करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असे संकेत युवासेनेकडून दिले जात असल्याचं बोललं जातं आहे. तसं झालं तर ठाकरे कुटुंबातील तीन पिढ्यात आदित्य ठाकरे हे प्रत्यक्ष निवडणूक लढणारे पहिलेच व्यक्ती ठरणार आहेत.
आदित्य ठाकरे यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. मात्र या चर्चांना काही अर्थ नसल्याचं शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आणि या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ठाकरे कुटंबीय कोणतंही दुसरं-तिसरं पद घेणार नाहीत, ते राज्याचं नेतृत्व करतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं.