Shridhar Patankar यांना आणखी एक झटका? ED ठाण्यातील प्रकल्पावर कारवाई करण्याच्या तयारीत
ईडीने श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील आणखी एका प्रोजेक्टवर कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी काल (23 मार्च) या गृहनिर्माण प्रकल्पावर जाऊन पाहणी केली.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. श्रीधर पाटणकर यांच्या श्री साई बाबा गृह निर्मिती प्रोजेक्टवर मंगळवारी (22 मार्च) अंमलबजावणी संचलनालयाने कारवाई करत 11 फ्लॅट्स जप्त केले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार ईडीने ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील आणखी एका प्रोजेक्टवर कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे.
ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी काल (23 मार्च) या गृहनिर्माण प्रकल्पावर जाऊन पाहणी केली. पाचपाखाडीमधील प्रकल्पात श्रीधर पाटणकर यांची भागीदारी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या प्रकल्पात झालेला आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहे. या प्रकल्पातही नंदकुमार चतुर्वेदी यांनी आर्थिक गुंतवणूक केल्याचं सांगितलं जात आहे.
श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची कारवाई
अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ई़डीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती.
काय आहेत आरोप?
चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनी संगनमताने पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुपमधील कंपनीमधील तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचं दाखवलं. पुष्पक ग्रुपच्या महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मदतीने साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पात अवैध रक्कम गुंतवल्याचा आरोप ईडीच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
- Aaditya Thackeray : मामावरील कारवाईनंतर भाच्याची प्रतिक्रिया, आदित्य ठाकरे म्हणाले......
- Uddhav Thackeray : ईडीची थेट उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावर कारवाई; 6.45 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच
- Nitesh Rane : उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्यावरील ईडीच्या कारवाईनंतर नितेश राणेंचं जुनं ट्वीट व्हायरल
- नोटबंदीमुळे ठाकरेंचे मेहुणे अडचणीत? नोटबंदीनंतर पुष्पक ग्रुपच्या मालकांवर कारवाई, 'या' प्रकरणाचं नेमकं कनेक्शन काय?