Annabhau Sathe : दिल्लीतील साहित्य संमेलनात AI फोटोंच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचा जीवनप्रवास उलगडला
Annabhau Sathe : दिल्लीतील साहित्य संमेलनात AI फोटोंच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचा जीवनप्रवास उलगडला

Mumbai : बार्शी येथील संजय श्रीधर कांबळे यांना दिल्ली येथील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी विशेष निमंत्रण दिले गेले होते. दिनांक 21 ,22, 23 फेब्रुवारी या काळामध्ये दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये हे संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनात तालकटोरा स्टेडियममध्ये अण्णाभाऊ साठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तसेच या साहित्य नगरीमध्ये एक ठळक वैशिष्ट्य म्हणून संजय श्रीधर कांबळे यांनी निर्माण केलेल्या AI तंत्रज्ञानाने निर्मित साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा चित्र प्रवास घडवणारी छायाचित्रे प्रदर्शनात मांडली आहेत.
या चित्र प्रदर्शनाला 72×20 इतकी आकर्षक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब ,केंद्रीय मंत्री प्रताप सिंह जाधव, खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्रातील माजी मंत्री विश्वजीत कदम ,लक्ष्मण ढोबळे, राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, विजयसिंह कोलते ,आरोग्य संचालक डॉ. प्रदीप आवटे, महिला बाल कल्याण सहाय्यक आयुक्त सुवर्णा पवार, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार, अनुज नहार, यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर यांनी उपस्थिती लावून अण्णाभाऊ साठे पुस्तक भेट व चित्रप्रदर्शनाचा आनंद घेतला. गतवर्षी पुणे शहर व परिसरातील लाखो अण्णाभाऊ साठे प्रेमींनी या प्रदर्शनाचा आनंद घेतला होता. यावर्षी महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त चित्र प्रदर्शनातील अनेक फोटो महाराष्ट्रभर प्रदर्शित झाल्याचे पाहायला मिळत होते . हे प्रदर्शन दिल्लीमध्ये व्हावे यासाठी सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी संजय श्रीधर कांबळे यांना विशेष निमंत्रण दिले आहे . प्रदर्शनाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता संजय कांबळे यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील बालपणापासून ते अण्णाभाऊ साठेंचा रशिया प्रवासापर्यंत ची काही ठळक वैशिष्ट्ये असणारी छायाचित्रे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. हे एक विशेष प्रदर्शन म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. या चित्रांचा समावेश असणारे एक पुस्तकही नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे .या पुस्तकाच्या भेटीचा कार्यक्रम दिल्लीमध्ये मान्यवरांच्या हस्ते केला जात आहे. या प्रदर्शनासाठी अक्षय मस्के, अक्षय वेताळ, लोकेश अनभुले ,दुर्गेश काळे, शिवकुमार देडे ,जयकुमार लोहार आदी मित्रपरिवार परिश्रम घेत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























