Chandrashekhar Bawankule : नितेश राणेंच्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, मविआच्या आमदारांनाही निधी देणार: चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule On Funds : ठाकरे आणि महाविकास आघाडीची गावं टार्गेट करा. गाडीत बसवून पट्टे घालून भाजपात प्रवेश द्यायचा कार्यक्रम करा असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं.

यवतमाळ : नितेश राणे यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्राचा चौफेर विकास करू असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. कोणताही मतदारसंघ विकासामध्ये मागे राहणार नाही, त्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनाही निधी देणार असल्याचं ते म्हणाले. ठाकरे गटाच्या सरपंचांना एक रुपयाही निधी मिळणार नाही असं वक्तव्य भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीसयांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेस सांगितलं आहे की या महाराष्ट्राचा चौफर आम्हाला विकास करायचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांनाही निधी दिला जाईल. महाराष्ट्राच्या विकासात कुठेही असमतोलता निर्माण होणार नाही किंवा कोणत्याही मतदारसंघाचा विकास थांबू नये ही आमची भूमिका आहे. महायुती सरकारची, देवेंद्र फडणवीसांची भूमिका आहे की महाराष्ट्राचा पूर्ण विकास करणे."
काय म्हणाले होते नितेश राणे?
नविन आर्थिक वर्षात सरपंचांची यादी मी घेऊन बसणार आहे. ठाकरे गटाच्या सरपंचांना शून्य टक्के निधी देणार हे निश्चित आहे. भाजपचे खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान आहेत हे कुणीही विसरू नये. आता आपली सत्ता आली आहे. समित्या, पदांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. संधीचं सोन करा.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्यावर अन्याय झाला. सगळी कामं नाकारली, निधी दिला नाही. महाविकास आघाडीच्या काळात सगळे अनुभव आम्ही घेतले. सगळ्या प्रकल्पांना स्थगिती देण्याच काम केलं. आमच्या लोकांना जेलमध्ये टाकल गेलं. आता जंगल दाखवायचं काम आम्ही करणार आहोत. कर्जाची परतफेड व्याजासह करणार आहोत. मी पालकमंत्री झालो म्हणून काहीजण गोव्यात जात आहे. मालमत्ता विकत आहेत. पण, गोव्यातही मुख्यमंत्री भाजपचे प्रमोद सावंत आहेत हे लक्षात ठेवावं. उबाठा आणि महाविकास आघाडीची गाव टार्गेट करा. गाडीत बसवून पट्टे घालून भाजपात प्रवेश द्यायचा कार्यक्रम करा.
ही बातमी वाचा:



















