एकीकडे मनसे-शिवसेना युतीची चर्चा, दुसरीकडे ठाकरेंनी मनसेचा मोहरा फोडला, 'मातोश्री'वर शिवबंधन
MNS Shiv Sena Alliance: शिवसेना ठाकरेंकडून युतीचा प्रस्ताव आल्यास राज ठाकरे त्यावर सकारात्मक निर्णय घेतील असे संकेत मनसे नेत्यांनी दिले. त्याचवेळी मनसेच्या एका नेत्याने ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला.

मुंबई : एकीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मातोश्रीवर घडलेल्या एका घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अंधेरी पूर्वमधील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधण्यात आलं. तसेच ठाकरेंना सोडून गेलेल्या नेत्या सुजाता शिंगाडे या पुन्हा ठाकरेंकडे परतल्या. त्यांचाही पक्षप्रवेश ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला.
मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी एक पत्रकार परिषद घेऊन शिवसेना ठाकरेंसोबत मनसे युतीसाठी सकारात्मक असल्याचं म्हटलं. त्यानंतर अवघ्या काहीच मिनिटात मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे त्याची एकच चर्चा सुरू झाली आहे.
वैभव दळवी हे मनसेचे अंधेरी पूर्वचे पदाधिकारी होते. काही दिवसांपासून त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी त्यांच्या समर्थकांसह हाती शिवबंधन बांधलं. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब आणि इतर प्रमुख नेते हजर होते.
मुंबई महापालिका निवडणूक कधीही जाहीर केली जाऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी पावले उचचली आहेत. वैभव दळवींचा पक्षप्रवेश हा त्याचाच भाग असल्याचं सांगितलं जातंय.
वैभव दळवी आमचा कार्यकर्ता नाही, मनसेचे स्पष्टीकरण
ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले वैभव दळवी हे आमचे कार्यकर्ते नाहीत. 2014 साली त्यांनी भाजपचं काम केल्यानंतर त्याचवेळी त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती असं स्पष्टीकरण मनसेचे नेते अविनाश देशपांडे म्हणाले.
सुजाता शिंगाडे स्वगृही परतल्या
शिंदे गटात जाऊन ठाकरेंकडे परत आलेल्या सुजाता शिंगाडे यांना पुन्हा एकदा पक्षात प्रवेश देण्यात आला. त्यावेळी आपण आपल्या घरी परतल्याचं समाधान वाटत असल्याची भावना सुजाता शिंगाडे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, "ओरिजनल शिवसेना ही मातोश्रीच आहे. मी शिंदे गटामध्ये जाऊन चूक केली. मला कोणताही आमिष दिलं नाही त्यामुळे मी मिंधी नाही. शिंदे गटात गेल्यानंतर मला काही रात्री झोप झोप लागत नव्हती . मी फार मोठी चूक केली होती हे मला समजलं."
सुजाता शिंगाडे पुढे म्हणाल्या की, "शिंदे गटात जाणारे हे सर्व नगरसेवक कोट्यवधी रुपये देऊन जात आहेत. सगळ्यांनाच एकनाथ शिंदे गटामध्ये त्रास होत आहे. शिंदे गटामध्ये कोणाचाच एकमेकांना ताळमेळ नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पैसे देऊन सगळ्यांना खरेदी केले."
ही बातमी वाचा :
























