एक्स्प्लोर
राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावं : आशिष शेलार
राज ठाकरेंच्या भाषणांवर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा, हल्ली शरद पवार यांचा प्रभाव दिसून येतो, असाही टोला लगावला.
मुंबई : ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केलं, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली आहेत, अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला. तसेच, ‘मोदीमुक्त भारत’ हे जरा जास्तच झाले, राज ठाकरेंनी आपला स्तर पाहून बोलावे, असेही ते म्हणाले.
विधानसभा ‘मनसेमुक्त’ झाली, मुंबई महापालिकेतील उरले-सुरलेले नगरसेवकही पळून गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, अशी टीका शेलारांनी राज ठाकरेंवर केली. तसेच, याआधी राज ठाकरेंच्या भाषणांवर बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव दिसायचा, हल्ली शरद पवार यांचा प्रभाव दिसून येतो, असाही टोला लगावला.
अतुल भातखळकरांचीही राज ठाकरेंवर टीका
“मोदीमुक्त भारत करण्याआधी महाराष्ट्रानेच त्यांना मनसेमुक्त केलेला आहे. पराभूत मानसिकतेतून केलेली ही केविलवाणी धडपड आहे. ‘मोदीमुक्त भारत’ करण्यासाठी यांच्याकडे नेते कोण आहेत? यांचे नेते गल्लीपुरते मर्यादित आहेत.”, अशी टीका आमदार अतुल भातखळकरांनी राज ठाकरेंवर केली.
ज्यांनी नगरसेवक पळवले, त्यांच्यावर टीका नाही. पण भारत मोदीमुक्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतो आहे, असेही भातखळकर म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले?
''भारताला 1947 साली पहिलं स्वातंत्र्य मिळालं, दुसरं स्वातंत्र्य 1977 साली मिळालं आणि आता 2019 साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा,'' असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. मोदींचा सामना करण्यासाठी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
मुंबईत शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’त राज ठाकरे बोलत होते. त्यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मोदींनी देशाला फसवलं आहे. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे लोकांनी बेसावध राहू नये, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement