(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मॅट्रीमोनियल साईटवरुन लग्नाचं आमिष, 35 महिलांना लाखो रुपयांना घातला गंडा, मुंबई पोलिसांकडून अटक
कल्याणमधील एका भामट्याने लग्नाचं आमिष दाखवून 35 महिलांना लाखो रुपयांना लुबाडल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : सध्या इंटरनेटच्या ऑनलाईन युगा सर्वच गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध असतात. अशातच जीवनाचा जोडीदार शोधण्यासाठीही मॅट्रिमोनियल साईट्स असल्याने त्यावर अनेकजण आपल्याला हवा तसा साथीदार शोधत असतात. पण यावरुन काहीजण फसवणूक करत असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान मुंबई गुन्हे शाखा-7 च्या पोलिसांनी अशाच एका भामट्याला अटक केली असून त्याने मॅट्रिमोनियल साइटवरुन जवळपास 35 महिलांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे. आरोपीचं नाव विशाल चव्हाण उर्फ अनुराग चव्हाण असून तो 34 वर्षांचा आहे.
क्राइम ब्रांचचे अधिकारी सुधीर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार कांजुरमार्ग पोलीस स्थानकात एका 28 वर्षीय महिलाने केलेल्या तक्रारीतून चव्हाणला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. संबधित महिलेने लग्नासाठी साथीदार शोधण्याकरत एका मॅट्रिमोनियल साइटवर प्रोफाइल बनवलं. त्यावरच तिची भेट चव्हाणसोबत झाली. त्याने तो एक श्रीमंत व्यक्ती असून लग्नासाठी उच्च शिक्षित मुलगी शोधत असल्याचं सांगितलं. संबधित मुलगीही त्याच्या गोड बोलण्याला भुलली. त्यानंतर आरोपीने त्या मुलीला शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचा सल्ला दिला. ज्यासाठी त्याने तिच्याकडून अडीच लाख रुपये देखील घेतले. पैसे मिळताच चव्हाणने तिच्याशी बोलणं बंद केलं. बऱ्याच दिवसानंतरही तो बोलत नव्हता तसचं तिचे पैसेही त्याने परत न दिल्याने अखेर तिला तो भामटा असल्याचं कळालं. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार केली.
मोबाईल नंबरच्या सहाय्याने पोलिसांनी केली अटक
पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. त्यांना संबधितं महिलेकडून चव्हाणचा मोबाईल नंबर मिळाला. त्यानंतर त्यांनी पुढे तपास केला असता आरोपी कल्याणमध्ये रहात असल्याचं पोलिसांना कळालं. त्यानंतर त्याठिकाणाहून त्याला अटक करत त्याचा फोन तपासला असता त्याने अनेक महिलांना अशाप्रकारे गंडा घातल्याचं समोर आलं. त्याने जवळपास 35 महिलांना 25 ते 30 लाखांना लुबाडलं होतं. तो मॅट्रिमोनियल साइटसह, फ़ेसबुक आणि इन्स्टाग्रामवर देखील अॅक्टिव्ह असल्याचं समोर आलं आहे.
चव्हाणचा आणखी एक फ्रॉड आला समोर
चव्हाण याने त्याची एक खोटी प्रोफाइल सोशल मीडियावर बनवली आहे. ज्यामध्ये तो एका अॅपल कंपनीत मोठा अधिकारी असल्याचं सांगितलं आहे. ज्यातून तो आयफोन 13 सारखे महागडे मोबाईल स्वस्तात विकण्याचं आमिष दाखवून लोकांना लुबाडत असल्याचंही समोर आलं आहे.
इतर बातम्या :
- Pune : अपहरण झालेला पुण्यातील चार वर्षाचा स्वर्णव सापडला; अपहरणाचं कारण अद्याप गुलदस्त्यात
- हृदयद्रावक! निर्माणाधिन इमारतीमधील लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात 10 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
- पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात गुन्हेगारांचा राडा, हातात धारधार हत्यारे घेऊन घातला नंगानाच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha