Cocaine Smuggling : मुंबईत 69 कोटी रुपयांच्या 6.90 किलो कोकेनसह युरोपियन नागरिकाला अटक
DRI मुंबई युनिटच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 69 कोटी रुपयांच्या 6.90 किलो कोकेनची तस्करी करताना एका परदेशी नागरिकाला अटक केली.
मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई युनिटच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 69 कोटी रुपयांच्या 6.90 किलो कोकेनची तस्करी करताना एका परदेशी नागरिकाला अटक केली आहे. 24 वर्षीय परदेशी व्यक्ती ट्रॉली बॅग घेऊन प्रवास करत होता आणि त्याच बॅगमधून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
आरोपी परदेशी नागरिक आर्टर्स लिओ झिनबर्ग्स हा युरोपमधील लॅटविजस रिपब्लिकाचा नागरिक आहे. केंद्रीय एजन्सीला मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे सोमवारी (6 जून) त्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आले.
विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी झिनबर्ग्सला त्याच्या आगमनानंतर अडवले. त्याच्या वैयक्तिक झडतीमध्ये कोणताही अंमली पदार्थ सापडला नाही. त्यानंतर त्याच्या तपकिरी रंगाच्या ट्रॉली बॅगची झडती घेतली असता त्यात महिलांच्या चप्पल आणि कपड्यांशिवाय 'किसाबोर'चे पाच पुठ्ठे सापडले. बॉक्स उघडल्यावर 'किसाबोर क्रीम'ची छोटी पाकिटे सापडली. ही पाकिटे उघडली असता पांढर्या रंगाची पावडर प्लॅस्टिकच्या दुहेरी थराने पॅक केलेली आढळून आली. एनडीपीएस फील्ड टेस्ट किटमध्ये संबंधित पावडरची चाचणी केल्यावर ती कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीदरम्यान आरोपीने डीआरआय अधिकार्यांसमोर दावा केला की, तो लॅटव्हियामध्ये अँड्र्यू डॉन डायगो नावाच्या एका व्यक्तीला भेटला, ज्याने ब्राझिलियन व्यक्तीशी संपर्क साधला. या ब्राझिलियन व्यक्तीने काही आर्थिक फायद्यासाठी मुंबईत तस्करी करण्यासाठी त्याला कोकेन दिली होती, असे सूत्रांनी सांगितले.
कायद्याची अंमलबजावणी करणार्या यंत्रणांच्या रडारपासून दूर राहण्यासाठी, आरोपी परदेशी नागरिकाने प्रथम साओ पाउलो ते दोहा असा कतार एअरवेच्या फ्लाईटने (QR 774) प्रवास केला होता आणि नंतर इंडिगोच्या फ्लाईटने दोहा ते मुंबई असा प्रवास केला होता.