महाबीज'च्या विरोधात युवक काँग्रेसचा एल्गार; मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या टेबलवर फेकलं सोयाबीन बियाणं
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा आजच्या आंदोलनात समावेश होता. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तब्बल चार तास महाबीजचं मुख्य कार्यालय आपल्या आंदोलनानं दणाणून सोडलं.
अकोला : आज महाबीजच्या विरोधात थेट सत्ताधारी काँग्रेसच रस्त्यावर उतरली. आज 'महाबीज'च्या अकोल्यातील मुख्य कार्यालयावर युवक काँग्रेसनं हल्लाबोल आंदोलन केलं. बोगस सोयाबीन बियाण्यांविरोधात विरोधात युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलं आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा आजच्या आंदोलनात समावेश होता. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तब्बल चार तास महाबीजचं मुख्य कार्यालय आपल्या आंदोलनानं दणाणून सोडलं. सव्वातीन वाजता अखेर महाबीज आणि सरकारच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. महिनाभरात मागण्यांवर सरकार निर्णय घेणार असल्याच आश्वासन यावेळी देण्यात आलं.
बोगस सोयाबीन बियाणं फेकलं 'एमडीं'च्या टेबलवर
संतप्त युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची कैफियत या वेळी 'महाबीज'चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांच्यासमोर मांडली. कार्यकर्ते यावेळी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी अडून बसले होते. यासोबतच शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची मागणीही या कार्यकर्त्यांनी लावून धरली होती. यासंदर्भात कारवाईचे अधिकार महाबीजला नसल्याचे सांगत भंडारी यांनी हात वर केलेत. अखेर संतप्त युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाया गेलेलं सोयाबीन बियाणं मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांच्या टेबलावर फेकलं. यावेळी महाबीजनं दिलेलं लेखी आश्वासन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकलं.
या होत्या आंदोलकांच्या मुख्य मागण्या :
- शेतकऱ्यांना बियाणं बदलवून न देता संपूर्ण पिकाचा खर्च नुकसान भरपाई म्हणून द्यावा.
- बियाणं प्रमाणित करणाऱ्या यंत्रणेवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत कारवाई करावी.
- यासंदर्भातील सर्वेक्षण तातडीनं आटोपण्यात यावं.
- भविष्यात अशा चुका आणि नुकसान टाळण्यासाठी यंत्रणा दुरूस्त करावी.
आंदोलनाची घेतली काँग्रेसच्या वरिष्ठांनी दखल :
युवक काँग्रेसच्या आंदोलनानंतर काँग्रेसमधील वरिष्ठ पातळीवरील काँग्रेस नेत्यांनी आंदोलनाची दखल घेतली. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात कृषीमंत्र्यांशी आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा केली. यासोबतच प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही आंदोलक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. अकोल्यात गेल्या अनेक वर्षानंतर गाजलेलं हे युवक काँग्रेसचं पहिलंच आंदोलन आहे.
अखेर झाली आंदोलनाची यशस्वी सांगता :
शेतकऱ्यांना संपूर्ण पिकाच्या नुकसानीचा बदला महाबीजनं द्यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी लावून धरली. अखेर दुपारी सव्वा तीन वाजता हे आंदोलन संपलं. युवक काँग्रेसच्या मागण्यांवर सरकार महिनाभरात निर्णय घेण्याचं लेखी आश्वासन यावेळी सरकारच्या वतीने देण्यात आलं. महाबीजचे बदली करून दिलेले बियाणे घेण्यास नकार देणार्या शेतकर्यांना बियाण्याची किंमत देण्याचं आश्वासन यावेळी महाबीजनं दिलं.
आंदोलनात उडाला फिजीकल डिस्टंसिंगचा फज्जा :
आजच्या आंदोलनात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टंसिंगचा अक्षपश: फज्जा उडवल्याचं पहायला मिळालं. आंदोलकांमधील काही कार्यकर्त्यांना मास्क घालण्याचाही विसर पडल्यातं चित्रं होतं. पोलिसांनाही या कार्यकर्त्यांना फिजिकल डिस्टंसिंग पाळण्यासह मास्क घालण्याची सुचना वारंवार करावी लागलीय.