सामान्य माणसांंसाठी घरांच्या किंमती कमी होणार का? : आमदार आशिष शेलार
बहुचर्चीत प्रिमियममध्ये सूट देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी घराच्या किंमती आता किती कमी होणार..? असा सवाल भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : बांधकाम व्यवसायाला उभारी देण्यासाठी प्रिमियममध्ये हजारो कोटींची सूट विकासकांंना दिली तरी सामान्य माणसाला घरांच्या किंमती कमी होतील का? असा सवाल भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला आहे. सामान्य माणसाला फायदा होणार का? याबाबत कोणतीच स्पष्टता देण्यात आलेली नाही, असेही ते म्हणाले.
कोरोनामुळे अडचणी आलेल्या बांधकाम व्यवसायाला उभारी देण्यासाठी प्रिमियममध्ये सूट देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाने घेतला. या निर्णयावरुन सत्ताधारी तीन पक्षांमध्ये धुसमूस होती. मागील मंत्रीमंडळ बैठकी पासून सतत नेमकेपणाने बोट ठेवत आमदार आशिष शेलार यांनी या विषयावरुन तीन्ही पक्षांमधील बेबनाव उघड केला होता.
आज ही फाईल मंत्री मंडळासमोर येण्याआधी दुपारी याबाबत सूचक ट्विट करताना आमदार अड आशिष शेलार म्हणाले होते की, विकासकांना प्रिमियममध्ये सूट देण्याची फाईल आज पुन्हा मंत्रीमंडळात येणार असे समजतेय...पण सगळं नीट "ठरलंय" ना? काँग्रेसचं मन वळलंय ना? नाहीतर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ बघून घाई आणि हात म्हणायचा नाही-नाही! आमचा सवाल एवढाच आहे घरं घेणाऱ्या सामान्य मुंबईकरांना फायदा होणार का? प्रिमियमच्या सूटीची खैरात बिल्डरला वाटाल आणि घरं घेणाऱ्यांची स्टॅम्पड्युटी विकासक भरेल अशी फसवी अट टाकाल तर खबरदार. घरांच्या किंमती वाढवून स्टॅम्पड्युटी विकासक भरेल, असा हातभट्टीचा व्यवहार करुन सामान्य मुंबईकरांना फसवल तर आम्ही त्याचा जाब विचारतच राहू असे त्यांनी म्हटले होते.
तर आता निर्णय झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की,आज अखेर बहुचर्चीत प्रिमियममध्ये सूट देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. सत्तेसाठी काँग्रेसने लाथाबुक्या खाल्ल्याच..सर्वसामान्य मुंबईकरांसाठी घराच्या किंमती आता किती कमी होणार..? महापालिकांच्या महसूलात होणारी घट आता कशी भरुन काढणार? आम्ही सर्वसामान्यांसाठी प्रश्न विचारत राहू..
संबंधित बातम्या :