अहमदनगरच्या कोपरगावात पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण, शहरवासीयांसाठी न्यायालयात धाव तर पंतप्रधानांना साकडे
राष्ट्रपती व पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडून उत्तरही आले. मात्र आजपर्यंत या तक्रारींचे निवारण झाले नसल्याने पाणी प्रश्न जैसे थे आहे.
शिर्डी : उन्हाळ्यात पाणी टंचाईचं संकट आपण नेहमीच पाहतो मात्र ऐन पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात कोपरगावकरांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ कोपरगाव शहरवासियांवर आली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून असलेल्या या समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी थेट केंद्र सरकारला साकडे घातले असून न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघ, काळे आणि कोल्हे या दोन कुटुंबातमध्ये कायम सत्ता आपापसात वाटला गेला. मात्र गेल्या पंचवीस वर्षापासून आजही कोपरगाव शहरवासियांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. ऐन ऑगस्ट महिन्यात पाऊस सुरू असतानाही कोपरगावकरांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा होतोय. डोक्यावर पाऊस सुरू असतानाही पाण्यासाठी भर पावसात शहरवासियांना वणवण करण्याची वेळ आली आहे.
कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी जिल्हाधिकार्यांपासून थेट देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना पत्रव्यवहार करत या समस्येकडे लक्ष वेधले आहे. गेल्या तीन वर्षांपासून राजेश मंटाला कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नावर पत्रव्यवहार करत असून या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली आहे.
राष्ट्रपती व पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडून उत्तरही आले. मात्र आजपर्यंत या तक्रारींचे निवारण झाले नसल्याने पाणी प्रश्न जैसे थे आहे. हा प्राणी प्रश्न सुटावा यासाठी माझे प्रयत्न सतत सुरू राहतील असंही राजेश मंटाला यांनी स्पष्ट केलं
शहरातून वाहत असलेली गोदावरी नदी काही दिवसांपूर्वी दुधडी वाहत असताना शहरवासीयांना 8 दिवस आड पाणी पुरवठा होतोय. डोक्यावर पाऊस पडत असताना महिला भर पावसात पाणी भरण्यासाठी पावसात भिजत असल्याची समस्या एका महिलेने बोलून दाखवली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून कोपरगाव शहरवासियांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. देशाचे राष्ट्रपती पासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रार केली मात्र आजही भर पावसाळ्यात आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने कोपरगाव शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही समस्या कधी सुटणार याकडेच कोपरगाव शहरवासीयांचे लक्ष लागले आहे...