Unseasonal Rain : दुपारपर्यंत उष्णतेची लाट, तर संध्याकाळी अवकाळी पावसाचं थैमान; विदर्भाला अवकाळी पावसाने पुन्हा झोडपलं!
Vidarbha Weather Update : विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Vidarbha Weather Update नागपूर: विदर्भात (Vidarbha) गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेच्या लाटेने (Temperature) हैराण झालेला नागरिकांना दुपारनंतर मात्र अवकळी पावसासह सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाचा सामना करावा लागला आहे. अचानक आलेल्या दमदार पावसाने यवतमाळ, बुलढाणा, अकोला, नागपूरसह इतरत्र एकच दाणादाण उडवली आहे.
यात अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहे. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे घरावरची पत्रे उडून गेल्याच्या घटनाही घडल्या आहे. एकीकडे विदर्भात उष्णतेच्या पारा (Temperature) रोज नवे उच्चांक गाठत असताना मे महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने बळीराजा देखील आर्थिक अडचणीत सापडला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात विक्रमी तापमामाची नोंद
यवतमाळ जिल्ह्यात आज 46 अंश सेल्सिअस अशी विक्रमी तापमामाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान ठरले असून गेल्या पाच वर्षांतले हे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर आज दिवसभराच्या कडक उन्हानंतर सायंकाळच्या सुमारास यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्याला अवकाळी पाऊस आणि वादळीवाऱ्याचा जोरदार फटका बसला आहे. या वादळामुळे अनेक घरावरील तीन पत्र उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर यात एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
25 घरांची पडझड, अनेक मोठी झाडे उन्मळून पड
यवतमाळच्या आर्णी आणि महागांव तालुक्यात अचनाक झालेल्या वादळीवाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आर्णी तालुक्यातील पाभळ तर महागांव तालुक्यातील तिवरंग, चिखली, मलकापूर या गावांना वादळाचा तडाखा बसला. पाभळ येथील 25 घरांची पडझड झाली आहे. तर अनेक घरावरील टिनपत्रे उडाल्याची माहिती समोर आली आहे. या सोबतच अनेक मोठी झाडे उन्मळून पडली असल्याने काही रस्ते देखील काही काळ बंद झाले होते. एकुणात अवकाळी पावसाने आज जिल्ह्यात एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे.
अकोल जिल्ह्याला अवकाळी पावसाने पुन्हा झोडपलं!
दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून अकोला (Akola) शहरात उष्णतेची लाट आल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. परिणामी, उष्णतेचा धोका लक्षात घेता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली आहे. तर पुढील तीन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. असे असताना आज दुपारनंतर अकोला जिल्ह्यातील अकोट भागात जोराच्या वादळीवाऱ्यांसह तुरळक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अकोल जिल्ह्याच्या पणज गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील गोदामावरील टिनपत्रे वाऱ्यामूळ उडाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या