(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidarbha Weather Update : विदर्भात उन्हाचा प्रकोप कायम! उष्माघाताने भंडाऱ्यात वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू
मागील दोन दिवसापासून भंडाऱ्यात तापमानाचा पारा वाढल्यानं एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्ध दांपत्यांचा घरातचं मृतदेह आढळून आला आहे. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शंकाही आता उपस्थित केली जात आहे.
Bhandara News भंडारा : एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्ध दांपत्यांचा राहत असलेल्या घरातचं मृतदेह आढळून आला आहे. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी इथं उघडकीस आलीय. मनोहर महागु निमजे (वय 80) आणि पत्नी मीरा मनोहर निमजे (वय 70) असे या मृतक वृद्ध दांपत्यांचे नाव आहे. मागील काही दिवसात भंडारा जिल्ह्यातील तापमानाने (Temperature) उच्चांकी गाठले आहे. त्यामुळं या वृद्ध दांपत्यांचा मृत्यू उष्माघातानं झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृद्ध दांपत्याला लकवा, बीपी आणि शुगरचा त्रास असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मागील दोन दिवसात तापमानाचा पारा वाढल्यानं कदाचित उष्माघातानं ही त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शंका उपस्थित केली आहे.
भंडाऱ्यात विक्रमी तापमानाची नोंद
राज्यासह विदर्भात उष्णतेच्या पाऱ्याने उच्चांक गाठला आहे. वाढते तापमान आणि उकड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले असून आता साऱ्यांना पावसाची आतुरता लागली आहे. तर यंदा देशातील काही भागात उष्णतेच्या पाऱ्याने (Temperature) विक्रमी तापमान गाठत नवे उच्चांक प्रस्थापित केले आहे. अशातच भंडाऱ्यात शुक्रवारी विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी भंडाऱ्यात 46 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधील भंडाऱ्याचं हे सर्वाधिक उच्चांकी तापमान ठरलं. तर मागील अडीच वर्षातील भंडाऱ्यातील तापमानाचा हा सर्वाधिक उच्चांक असून प्रखर उष्णतेनं नागरिक आणि वन्यप्राण्यांचेही जीव होरपळून निघत आहे.
मागील आठवड्यापासून भंडाऱ्यात पारा वाढला असून यात उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघातामुळं आजारी असलेल्या आठ व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळं प्रखर उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी महत्त्वाचं काम असल्यासचं घराबाहेर पडावं, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आज वृद्ध दांपत्यांचा राहत असलेल्या घरातचं मृतदेह आढळून आल्याने त्यांचाही मृत्यू उष्माघातानेच झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
उन्हाची प्रखरता आणि विजेच्या लोडशेडींगमुळं पालेभाज्या करपल्यात
भातपीकाच्या शेतीसह जोडव्यवसाय म्हणून भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी बागायती शेती केली. मात्र, या वर्षीची प्रखर उष्णता आणि महावितरणच्या लोडशेडींगमुळं पिकांना वेळेत सिंचन करता येत नसल्यानं शेतातील पालेभाज्यांची पिकं अक्षरशः करपली आहे. महावितरण अधिकारी लोडशेडिंगचा नावावर कृषी फिडर दोन टप्प्यात सुरू करतात. काही दिवस रात्रीला तर, काही दिवस दिवसाला वीज पुरवठा करतात. जंगल व्याप्त परिसरातील शेतीत रात्रीला वीज पुरवठा होत असल्यानं जंगली श्वापदांच्या धोक्यामुळं शेतकरी शेतीवर जात नाही. त्यामुळं मागील आठवड्यात पिकांचं शेत हिरवागार दिसत होतं, मात्र आता त्याचं शेतातील पीक करपलं आहे. त्यामुळं आता शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या