Heavy Rain :विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान
Rain Update : उपराजधानी नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना शनिवारच्या सकाळपासून कोसळणाऱ्य मुसळधार पावसाने धो- धो धुतलंय. आज देखील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Vidarbha Rain Update : उपराजधानी नागपूरसह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना शनिवारच्या सकाळपासून कोसळणाऱ्य धुव्वाधार पावसाने (Heavy Rain) धो- धो धुतलंय. दरम्यान, अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या (IMD) वतीने केले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भाला बसला आहे. अशातच आज देखील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या दमदार पावसाचा फटका अनेक नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसला असून पावसाच्या पाण्यामुळे पिके खरडून निघाली आहे. तर सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत असून नदीकाठाच्या गावांना सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे.
'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज हवामान विभागाकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. तर आज सकाळपासून देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.दोन दिवसांच्या खंडानंतर आता पुन्हा जिल्ह्यात पावसाने एंट्री केलीय. तर या संततधार पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून अनेक नदी नाल्या काठावरील गावांना जिल्हा प्रसनांकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अशीच काहीशी परिस्थिती वर्धा जिल्ह्याची आहे. वर्ध्यात पुन्हा पावसाचा जोर कायम असून रात्रभरापासून पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात येलो अलर्ट दिला असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने शेतीची कामे खोळंबली आहे. सततच्या पावसाने कारंजा, माणिकवाडा रस्त्यावरील सावरडोह जवळील खडक नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी मार्ग बंद आहे.
पुरात अडकलेल्या 80 ते 90 लोकांना NDRF च्या टीम ने सुरक्षित स्थळी हलवले
गडचिरोली तालुक्यातील मौजा चांदाळा गावानजिकच्या कुंभी नाल्याच्या पुरामुळे शेतात काम करायला गेलेले नागरिक अडकून असल्याची माहिती प्राप्त होताच, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने एकूण 59 व्यक्तींना बाहेर काढले. यामध्ये 1 अंध व्यक्तीचा सुद्धा समावेश होता. तर इतर घटनेत देखील वैद्यकीय सुविधेसाठी अडकलेल्या 2 महिलांना ही सुरक्षित गडचिरोली रुग्णालयात पोहचवले. तर दुसरीकडे जिल्ह्यातील विविध ठिकाणी पुरामुळे अडकलेल्या 80 ते 90 लोकांना NDRF च्या टीम नी सुरक्षित स्थळी पोहचवले.
भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी
आज सकाळपासून भंडाऱ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. आज हवामान विभागांनं भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट घोषित केला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भंडारा शहरातही सकाळपासून जोरदार पावसानं हजेरी लावली असून ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. मागील आठवड्यात आलेल्या अतिवृष्टीनंतर आता पुन्हा एकदा उसंत घेतलेल्या पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे. सध्या नदी - नाले वाहू लागले असून अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली असून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पिकांची नासाडी झालेली आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी काढण्यासाठी मोफत जेसीबी
मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं होतं. याचा सर्वाधिक फटका पवनी आणि लाखांदूर तालुक्याला बसला. आठ दिवसांनंतरही पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली असल्यानं भात पिकांच्या शेतीची अक्षरशः नासाडी झाली आहे. शेतात साचलेलं पाणी काढण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावं लागतं असल्यानं पवनी येथील सामाजिक कार्यकर्ता किशोर पंचभाई यांनी आता पुढाकार घेतला आहे. पंचभाई यांनी त्यांच्याकडील जेसीबी मोफत देत शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील पुराचं पाणी बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळं पूरपीडित शेतकऱ्यांना मोफत मदत त्यांनी दिली असून कुणाकडूनही एक रुपयाही ते घेत नाहीत. त्यांच्या या मदतीची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा