वऱ्हाडी दोनशे गाई, जेवणाला पुरणपोळी.. लातुरात अनोखा विवाह सोहळा
कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर लातुराता एक अनोखा विवाह सोहळा पार पडला.
लातूर : लग्न करताना डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग शूट.. एक ना दोन अनेक प्रकार लोकप्रिय आहेत. मात्र, कोरोना काळात या सर्व प्रकारावर बंदी आली आहे. कमी लोकांत, कमी वेळेत लग्न उरकणे ही संकल्पना पुढे येत आहे. या धर्तीवर लातुरात एक लग्न संपन्न झाला. मात्र, यात वऱ्हाडी मंडळी दोनशेपेक्षा जास्त होते. थांबा लगेच कोरोनाचे नियम मोडले असला विचार करु नका. आधी बातमी तर वाचा.. ही 200 वऱ्हाडी मंडळी कोण आहेत हे समजल्यावर तुम्ही म्हणताल लग्न करावं तर असं..
लातूर येथील डॉक्टर भाग्यश्री आणि डॉक्टर सचिन या दोघांचा विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला. हा अनोखा सोहळा आता जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. कारण, हा विवाह सोहळा कुठल्या हॉलमध्ये, मंगलकार्यलयात किंवा मंडपात नाही तर गोशाळेत झाला. अतिशय मोजके पाहुणे लग्नास हजर होते. कोविड संसर्गामुळे आलेल्या बंधनाचे तंतोतंत पालन करण्यात आलं. या गोशाळेतील 200 पेक्षा जास्त गाई ह्याच पाहुणे असा थाट येथे ठेवण्यात आला होता.
लातूर शहरातील माहेश्वरी समाजातील डॉक्टर भाग्यश्री गोपाळ झंवर आणि जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कुंभारी पिंपळगाव येथील डॉक्टर सचिन सत्यनारायण चांडक यांचा विवाह श्री गुरु गणेश जैन गोशाळेत आज करण्यात आला. हा विवाह सहा महिन्यापूर्वी ठरला होता. मात्र, कोविड संसर्गामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या. लग्नात सरकारने घालून दिलेले कोणत्याही नियमाची पायमल्ली होणार नाही ह्या विचारावर दोन्ही परिवारातील पाहुण्यांचे एकमत झाले. अतिशय कमी वेळेत आणि कमी लोकांत लग्न करण्याचा विचार आला.
सध्या कोणतेही मंगल कार्यलय सुरु नाही, हॉटेल बंद आहेत, कोणाच्या घरी करणेही योग्य होणार नाही. अशी चर्चा झाली मग एक कल्पना सुचली.. ती गोशाळेची. लग्नात आशीर्वाद देण्यासाठी अनेक पाहुण्यांची हजेरी असते. आता आपले आप्तस्वकीय हे ह्या गाईचं आहेत. ह्या भावनेतून लातूर शहरातील श्री गुरु गणेश जैन गोशाळेत कार्य करावे असा विचार आला. सर्वांना तो आवडला. आज अतिशय मोजक्या लोकांत हा विवाहविधी पार पडला. गोशाळेतील गाईंना पुरणपोळीचा बेत ठेवण्यात आला होता. जेही मोजके लोक लग्नास हजर होते. त्यांनी सर्व नियमांचे पालन करत कमी वेळात लग्न विधी संपन्न केले.