(Source: Poll of Polls)
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर; लोकसभेचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता
Uddhav Thackeray In Buldana: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात बुलढाणा लोकभेच्या जागावेर उमेदवार घोषित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Uddhav Thackeray In Buldana: शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्यात सिंदखेडराजा आणि मेहकर येथे जनतेशी संवाद साधणार आहे. गेल्या महिन्यातील 22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे बुलढाणा जिल्ह्याच्या (Buldhana) दौऱ्यावर होते. 22 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात तीन सभा घेतल्या आणि उर्वरित दोन सभा या 23 फेब्रुवारी रोजी मेहकर आणि सिंदखेड राजा येथे होणार होत्या, मात्र त्याच दिवशी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi यांच्या निधनाने हा दौरा उद्धव ठाकरे यांना अर्धवट सोडून मुंबईला परत जावं लागलं होत. त्यामुळे आता उरलेल्या मेहकर आणि सिंदखेड राजा येथील सभा आज उद्धव ठाकरे घेणार आहेत.
सभेत उमेदवार घोषित होण्याची शक्यता
आगामी लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. त्यामुळे जवळ जवळ सर्वच पक्षानी आपआपल्या पक्षाचा प्रचार-प्रसार आणि सभांचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील कामाला लागले असून, ते स्वत: मैदानात उतरून जनसंवाद दौऱ्याचा झंझावात करत आहेत. त्या अनुषंगाने आज उद्धव ठाकरे यांची बुलढाण्यात तोफ धडाडणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून नेमके काय भाष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुलढाणा लोकसभेची जागा महाविकास आघाडीतर्फे उबाठा गटाला मिळालेली आहे. तर या जागेवर प्रा.नरेंद्र खेडेकर संभावित उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र यावर अद्यापही शिक्कामोर्तब न झाल्याने या दोन सभेत उद्धव ठाकरे कुठली घोषणा करतात, याकडे तमाम जिल्हावाशियांचे लक्ष लागून आहे.
गेल्या 22 मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी चिखली, मोताळा आणि जळगाव जामोद येथे सभा घेतली होती मात्र या सभेत उद्धव ठाकरे यांनी प्रा. नरेंद्र खेडेकर हेच उमेदवार असतील, अशी कुठलीही घोषणा आपल्या भाषणात केलेली नाही. त्यामुळे आज या सभेत उद्धव ठाकरे याबाबत काही भाष्य करतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरे स्वतः मैदानात...
राज्यातील महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झाला नाही. मात्र असे असताना उद्धव ठाकरे यांनी आपला जनसंवाद दौऱ्याचा झंझावात अद्याप कायम ठेवला आहे. आज उद्धव ठाकरे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचे आज सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगरवरुन सिंदखेडराजा येथे आगमन होणार आहे. या दौऱ्यात ते प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते सिंदखेडराजा सभेत जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते कारने मेहकरकडे रवाना होणार असून मेहकर येथे दुपारी 1 वाजता प्रथम शारंगधर मंदिरात जाऊन दर्शन घेवून नंतर ते मेहकर नगर परिषद कार्यालयासमोरील मैदानात जनतेशी संवाद साधणार आहेत. या सभा आणि जनसंवाद दौऱ्याच्या निमित्याने स्थानिक नेते आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केल्याचे चित्र आहे. त्यामुळे आज या सभेत उद्धव ठाकरे नेमके काय भाष्य करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या