(Source: Poll of Polls)
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Exit Poll: महाराष्ट्रातील मतदान प्रकिया पार पडल्यानंतर देशभरातील विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत.
Exit Poll: मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या 288 मतदारसंघात आज काही अपवाद वगळता शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यात 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानात 58.22 टक्के मतदान झालं असून ही टक्केवारी 60 ते 65 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला (Vidhansabha) मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा फटका बसला होता. तब्बल 42 जागांवरुन भाजप महायुती केवळ 17 जागांवर आल्याची पाहायला मिळालं. पण, विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला पुन्हा सत्ता मिळणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमधून (Exit poll) महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो, असा अंदाज आहे. मात्र, 10 पैकी 3 संस्थांनी महाविकास आघाडीला बहुमताचा आकडा गाठता येईल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे, 10 संस्थांचा सरासरी अंदाज पाहता महायुतीला 139 ते 156 जागा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील मतदान प्रकिया पार पडल्यानंतर देशभरातील विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. विविध संस्थांच्या 10 एक्झिट पोलचा पोल ऑफ पोल काढला असता, राज्यात महायुतीला 139 ते 156 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडीला 119 ते 136 जागांवर यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण 10 संस्थांच्या सर्वेक्षणातून ही बेरीज काढण्यात आली आहे. चाणक्य स्ट्रॅटेजी, पोल डायरी, इलेक्ट्रोल एज, मॅट्रीझ, रिपब्लिक, न्यूज 24 पी-मार्क, एसएएस ग्रुप हैदराबाद, दैनिक भास्कर, लोकशाही आणि झी AI या 10 संस्थांच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. त्यामध्ये, 10 पैकी 7 संस्थांनी भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत दर्शवले आहे. तर, 3 संस्थांनी महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, या 10 संस्थांचा सरकारी एक्झिट पोल पाहिल्यास महायुतीला 139 ते 156 जागांवर विजय मिळू शकतो. तर, महाविकास आघाडीला 119 ते 136 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर, इतर व अपक्ष मिळून कमीत कमी 2 ते जास्तीत जास्त 29 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे, राज्यातील निवडणूक निकालानंतर अपक्ष व इतर पक्षातील विजयी उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
10 संस्थांच्या सर्वेक्षणापैकी 7 संस्थांनी महायुतीला बहुमताचा आकडा गाठण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामध्ये, चाणक्य, पोल डायरी, मॅट्रीझ, रिपब्लिक, न्यूज 24 पी, लोकशाही रुद्र आणि झी एआय या 7 संस्थांनी भाजप महायुतीला सर्वाधिक जागा दर्शवल्या आहेत. तर, इलेक्ट्रोल एज, एसएएस ग्रुप आणि दैनिक भास्कर ग्रुपने महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे, सर्वांचीच उत्कंठा ताणली असून 23 नोव्हेंबर रोजी अंतिम निकाल येईल.
10 संस्थांच्या सर्व्हेमधील ठळक वैशिष्टे
* विविध संस्थांच्या दहापैकी 7 पोलमध्ये महायुती पुढे, 3 ठिकाणी महाविकास आघाडी पुढे
* ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात सहा पोलपैकी तीन ठिकाणी शिंदेंची शिवसेना आघाडीवर, 2 ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आघाडीवर, एका ठिकाणी समान जागा
* शरद पवार वि अजित पवार यांच्यात सहा पोलपैकी सर्व सहाही ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडी
* सर्व दहाही पोलमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष, 78 ते 108 जागा मिळण्याचा अंदाज
* प्रमुख सहा पक्षांच्या लढतीत अजित पवारांची राष्ट्रवादी सहाव्या स्थानी. 14 ते 28 जागा मिळण्याची शक्यता
* अपक्षांना किमान 2, जास्तीत जास्त 29 जागा मिळण्याचा अंदाज
हेही वाचा
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?