Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी विधानसभा अन् मुंबई मनपासाठी शड्डू ठोकला; बोलावली संपर्कप्रमुखांची बैठक
उद्धव ठाकरे यांनी 288 विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीच्या दृष्टिकोनातून ही बैठक बोलावण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मिळालेल्या यशानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. उद्धव ठाकरे यांनी उद्या (11 जून) 288 विधानसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीच्या दृष्टिकोनातून ही बैठक बोलावण्यात आली आहे.
मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा सुद्धा मुंबईमध्ये मेळावा
उद्धव ठाकरे सर्व संपर्कप्रमुखांशी उद्या दुपारी साडेबारा वाजता सेनाभवनात संवाद साधणार आहेत. यावेळी सर्व विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखांकडून परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत. दुसऱ्या बाजूला मुंबईमधील पदाधिकाऱ्यांचा सुद्धा उद्या मुंबईमध्ये मेळावा पार पडणार आहे. बांद्रा येथील रंगशारदा सभागृहामध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी आमदार आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित असतील.
मुंबईतील माजी नगरसेवक पदाधिकारी यांचाही मेळावा
लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये महाविकास आघाडीला दमदार यश मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. याच माध्यमातून विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले जाणार आहेत. मुंबईतील माजी नगरसेवक पदाधिकारी यांचाही उद्या सायंकाळी पाच वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























