फडणवीसांच्या नव्या पेन ड्राईव्ह बॉम्बनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु, भाजप-राष्ट्रवादी नेत्यांचे ट्विटरवर दावे-प्रतिदावे
Twitter War Between BJP and NCP Leaders : डॉ. लांबेंचं कुणाशी कनेक्शन? वक्फ बोर्डाच्या डॉ. लांबेंचे दाऊदशी संबंधांच्या दाव्यानंतर आरोप-प्रत्यारोप
Twitter War Between BJP and NCP Leaders : वक्फ बोर्डाचे सदस्य डॉक्टर मुदस्सर लांबे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत (Maharashtra Assembly Session) केल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. लांबे यांची निवड फडणवीस यांनी त्यांच्या सत्ताकाळात केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी केला होता. तर डॉक्टर मुदस्सर लांबे गेली 15 वर्षे राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा दावा भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यांनी डॉक्टर लांबे आणि शरद पवार यांचा फोटो ट्वीट करून सना मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. लांबे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारल्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसेच, राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई अध्यक्षा अदिती नलावडे यांनीही एक फोटो ट्वीट केला आहे. त्यामुळे डॉक्टर मुदस्सर लांबे नेमके कुणाशी संबंधित आहेत आणि त्यांची नियुक्ती कुणी केली यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यानंतर डॉ. लांबे नक्की कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण दोन्ही पक्षांकडून डॉ. लांबे यांचे फोटो आणि व्हिडीओ ट्वीट करुन दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
काय म्हणाल्या होत्या सना मलिक?
सना मलिक शेख यांनी डॉ. मुद्दस्सिर लांबे यांच्यासह फडणवीसांचा फोटो ट्वीट केला होता. सोबतच म्हटलं होतं की, फडणवीसांनी सांगितलेलं अर्धसत्य हे पूर्ण खोटं आहे. डॉ. लांबे यांची 13 सप्टेंबर 2019 रोजी फडणवीस/भाजप सरकारनं वक्फ बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. महाविकास आघाडी सरकारची स्थापना नोव्हेंबर 2019 मध्ये झाली. माझ्या वडिलांना जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यात अल्पसंख्याक/वक्फ विभाग मिळाला. देवेंद्र फडणवीस डी-गँग नातेवाईक आणि बलात्काराच्या आरोपीसह असं त्यांनी म्हटलं होतं.
अमोल मिटकरींचं ट्वीट काय?
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. लांबे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारल्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, "काल माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहात दाउदशी संबंध असल्याचा ज्या डॉक्टर मुदस्सीर लांबे यांच्यावर आरोप केला. त्यांच्याच हस्ते सत्कार स्विकारतानाचा एक व्हिडीओ प्रेक्षकांनी अवश्य बघावा."
अदिती नलावडेंनी काय ट्वीट केलंय?
राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई अध्यक्षा अदिती नलावडे यांनीही एक फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी ट्वीट केलंय की, "कोण कोणत्या राजकीय पक्षात आहे, राजकीय नेत्याच्या जवळचा आहे हे फोटोवरून ठरवता येत असेल तर."
दरम्यान, काल (सोमवारी) विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवा पेनड्राईव्ह बॉम्ब सादर केला. यात एक ऑडिओ असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. यातील डॉ. मुद्दस्सिर लांबे (Dr. Muddasir Lambe) यांचे संबंध दाऊदशी असून डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान (Arshad Khan) यांच्यातील संभाषणाचा हा ऑडिओ असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. डॉ. लांबे यांना राज्य सरकारनं (State Government) वक्फ बोर्ड (Waff Board) वरती घेतलं आहे. मात्र एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेनं त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे, असंही फडणवीस म्हणाले होते.