Sudhir Mungantiwar : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्हिप लागू होत नाही, सुधीर मुनगंटीवारांचा दावा
विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी व्हिप लागू होत नसल्याचा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला.
Sudhir Mungantiwar : विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी व्हिप लागू होत नसल्याचा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर हेच विजयी होतील. 'जावई' विधानसभेचे अध्यक्ष होणार आहेत, असं म्हणत मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला. हे नवीन सरकार सेना भाजप युतीचं आहे. 165 ते 170 पेक्षा जास्त मतदान आमच्या बाजूने होईल असा विश्वास यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आजच्या दिवशी लोहशाहीचा विजय होईल असेही ते म्हणाले.
अध्यक्षपदाची निवडणूक ही सदस्यांनी करावी अशी तरतूद आहे. हे सदस्य लोकशाहीच्या मंदिरातील संरक्षक आहेत. त्यामुळं तुम्ही याच अध्यक्षांना मतदान करावं असा व्हिप काढण्याची कोणतीही तरतूद संविधानात नाही. म्हणून ओपन पद्धतीनं मतदान करणार आहोत असे ते म्हणाले. भाजपने हिंदुत्वाचा विचार असलेल्या शिवसेनेशी युती केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने काढलेला व्हिप लागू होत नाही. राहुल नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. जावई जरी विधानसभेचे अध्यक्ष होत असले तरी ते सत्याच्या बाजूने उभे आहेत. युतीच्या बाजूने ते उभे आहेत.
दरम्यान, पक्षाचा सच्चा कार्यकर्ता कसा असतो, स्वार्थ विरहीत कार्यकर्ता कसा असतो हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले. आरोप करणाऱ्यांना लोकशाही समजलीच नाही. निवडणुकीत जिंकल म्हणजे लोकशाही समजली असे होत नसल्याचे ते म्हणाले. अध्यक्ष पदासारखं पद रिक्त ठेवणं हा लोकशाहीवर हमला असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. महाविकास आघाडीत एकमत नव्हते म्हणून अध्यक्षाची निवड झाली नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, आज अधिवेशनाचा प्रारंभ झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा परिचय होईल. त्यानंतर कोल्हापूरमधील नवनिर्वाचीत विधानसभा सदस्यांचा परिचय होणार आहे. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा केली जाणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. प्रथम राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात येईल. होय नाही असे आवाजी मतदान होईल. जर कोणी पोल मागितला तर जागेवर उभ राहून त्याठिकाणी नंबर पुकारायचा आहे. त्यानंतर पिठासीन अधिकारी ज्या बाजून बहुमत असेल त्याची घोषणा करतील असे मुनगंटीवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: