Kolhapur : ईडी सरकारला जाब विचारण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर कामगार संघटनांचा मोर्चा धडकणार; कोल्हापुरातील आयटकच्या राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता
राज्यातील उद्योग गुजरातला गेल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. याचा जाब विचारण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर कामगारांचा मोर्चा धडकणार असल्याची माहिती ‘आयटक’चे नेते डॉ. भालचंद्र कानगो यांनी दिली.
Kolhapur : राज्यातील उद्योग गुजरातला गेल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. सध्याच्या ईडी सरकारला जाब विचारण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर कामगारांचा मोर्चा धडकणार असल्याची माहिती ‘आयटक’चे राष्ट्रीय नेते डॉ. भालचंद्र कानगो यांनी दिली. कोल्हापुरातील आयटकच्या राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता रविवारी झाली. कानगो केंद्र आणि राज्य सरकारच्या धोऱणांवर सडकून टीका केली. केंद्र सरकारचे कामगारविरोधी धोरण, खासगीकरण, भांडवलशाहीला बळ आदी मुद्यांवर डॉ. कानगो यांनी सडकून टीका केली.
दरम्यान, ईडी सरकारला जाब विचारण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर कामगार संघटनांचा 28 मार्च रोजी मोर्चा धडकणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कानगो यांनी समारोप सभेत चांगलाच हल्ला चढवला. ते म्हणाले, देशाची सत्ता हाती असणारा पक्ष स्थापनेपासून कामगारविरोधी व समतेला विरोध करणारा पक्ष आहे. यांनी भांडवलदारांची तळी उचलण्यात कोणतीही कसूर सोडलेली नाही. यांच्याकडून कामगारांना फारशा अपेक्षा नाहीत. त्यामुळे येत्या 2024 च्या निवडणुकीत या पक्षाच्या सरकारचा पाडाव करण्यासाठी कामगारांनी तयारीला लागावे.
ते पुढे म्हणाले, कामगार कायदे रद्द करून कामगार कोड चार भागांत केला. त्याचा ‘आयटक’ निषेध करते. मोदी सरकारने खासगीकरणाच्या नावाखाली देश विकायला काढला आहे. एलआयसीपासून बॅंकांपर्यंतच्या खासगीकरणाची तयारी सुरू आहे. गेल्या 75 वर्षांत देशाने खासगीकरणाला कधीही प्रोत्साहन दिले नव्हते. कारण, खासगीकरण हे नफ्यासाठी केले जाते. नफेखोरी वाढली, की शस्त्र उत्पादनाच्या कंपन्या वाढतात. यातून युद्धखोरीला प्रोत्साहन मिळते. असे होऊ नये किंवा त्यादृष्टीने सरकारने पावले उचलू नयेत, अशी आयटकची मागणी आहे.
अन्यायी कामगार कायद्याविरोधात रस्त्यावरील लढ्यातून संघर्षाची तयारी ठेवा
आयटकच्या अधिवेशनात बोलताना माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनीही गुंतवणुकीच्या नावाखाली कामगारांचं रक्त शोषण्याला आमचा ठाम विरोध असल्याचे म्हटले होते. सरकारच्या अन्यायी कामगार कायद्यांविरोधात रस्त्यावरील लढ्यातून संघर्षाची तयारी ठेवा, असे आवाहन त्यांनी केले होते. आयटकच्या (All India Trade Union Congress) कोल्हापुरातील तीनदिवसीय महाराष्ट्र अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
हसन मुश्रीफ म्हणाले, गुंतवणूकीसाठी उद्योजकांना आकर्षक सवलती देण्याबद्दल आमची हरकत असण्याची गरज नाही. परंतु, कामगारांचं रक्त शोषून घेऊन अशा प्रकारच्या गुंतवणूक येण्याला आमचा ठाम विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत कामगार विरोधी धोरणे करायची आणि उद्योगपतींना लाल कार्पेट अंथरून गुंतवणुकीसाठी आणायचे नाटक करायचे, अशा प्रकारचे उद्योग या देशात सुरू आहेत.
ते पुढे म्हणाले की, कामगार वर्गाने जागृत होण्याची वेळ आली आहे. नव्या बदलत्या कामगार कायद्यामध्ये कायम वेतनावरील कामगार हा प्रकारच बंद झाला आहे. या विरोधात रस्त्यावर उतरून लढा पुकारला नाही कायम कामगार ही संज्ञाच नाहीशी होईल. फक्त दैनिक वेतन, फिक्स पगार आणि कंत्राटी कामगार एवढेच तीन प्रकार शिल्लक राहतील. अशा लोकांच्या पाठीशी ठामपणे खंबीर उभा राहण्याचे काम कायमपणे करू.
इतर महत्वाच्या बातम्या